रस्त्याच्या उद्घाटनासाठी नारळ न आणल्याने ठेकेदारालाच चोपले

माजी नगरसेवकाचा प्रताप : प्रकार पाहून उद्घाटन न करताच आमदार माघारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th February, 09:01 pm
रस्त्याच्या उद्घाटनासाठी नारळ न आणल्याने ठेकेदारालाच चोपले

कोल्हापूर : इचलकरंजी येथील शांतीनगर भागातील रस्ता कामाच्या उद्घाटनावेळी फोडण्यासाठी नारळ न आणल्याच्या कारणावरुन संतापलेल्या माजी नगरसेवकाने ठेकेदारालाच कानाखाली लगावली. पोलीस ठाण्यापर्यंत गेलेले हे प्रकरण मिटवण्यात आले असले तरी माजी नगरसेवकाच्या प्रतापाचे किस्से आणि तक्रारी वाढतच आहेत. यावेळी लोकप्रतिनिधींनाही संताप अनावर झाल्याने ते उद्घाटन न करताच माघारी परतले.

शांतीनगर भागात एका रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. कार्यक्रमाचे नियोजन या भागातील माजी नगरसेवकाकडे होते. ठरल्या वेळेनुसार आमदार आवाडे हे कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. परंतु उद्घाटनासाठी तेथे श्रीफळच आणले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमदार आवाडे यांनी विचारणा केली असता माजी नगरसेवकाने चूक ठेकेदाराची असल्याचे सांगत संबंधित ठेकेदाराला जाब विचारत बेदम मारहाण केली. लोकप्रतिनिधींच्या समोरच हा प्रकार घडल्याने त्याची चर्चा रंगली आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेले होते. परंतु काहींच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा टाकण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, ठेकेदाराकडे नारळ न आणण्याचे कारण विचारता त्याने संबंधितांकडे खर्चासाठी पैसे दिल्याचे सांगितले. या भागातील काही नागरिक म्हणाले, रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. परंतु मागील चार महिन्यांपासून ते होऊ न देण्यास संबंधित माजी नगरसेवकच जबाबदार असल्याच्या तक्रारींचा पाढाच आमदार आवाडे यांच्यासमोर मांडला. त्यामुळे आमदार आवाडे यांनाही राग अनावर झाल्याने एकाही कामाचे उद्घाटन न करताच ते माघारी परतले.