अंत्यसंस्कारासाठी घरी नेताना मृत युवक झाला जागा...

हावेरी जिल्ह्यातील घटना : पत्नीने हंबरडा फोडताच बसला उठून

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
11th February, 06:28 pm
अंत्यसंस्कारासाठी घरी नेताना मृत युवक झाला जागा...

कारवार : रुग्णालयात मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेताना ती पुन्हा जिवंत झाल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. आपल्या आवडत्या ढाब्यानजीक आल्यानंतर ती व्यक्ती उठून बसली आणि कुटुंबीयांसह इतरांना आश्चर्याचा धक्का बसला.

हावेरी जिल्ह्यातील बंकापूर येथील मंजुनाथनगरातील रहिवासी बिष्टप्पा अशोक गुडीमनी (४५) ऊर्फ मास्तर आजारी होते. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले तरी ते बरे झाले नव्हते. त्यांना मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला अनेकांनी दिला. त्यानुसार कुटुंबीयांनी धारवाडमधील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. पण, प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. श्वसनाचा त्रास होऊन श्वास बंद झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

त्यांची पत्नी शीला व इतर नातेवाईक रुग्णवाहिकेतून मृतदेह बंकापूरला नेण्यासाठी निघाले. बंकापूरनजीक आल्यानंतर पत्नीने ‘ढाबा आला आता उठा, जेवण करुन घ्या’ असे म्हणून रडण्यास सुरुवात केली. त्यावेळी मृत झालेले बिष्टप्पा यांनी हालचाल केली. यामुळे काही क्षण कुटुंबीयांमध्ये घबराट निर्माण झाली. पत्नी शीला व इतरांनी तत्काळ त्यांना शिग्गावमधील खासगी रुग्णालयाकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन बिष्टप्पा जिवंत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर प्रथमोपचार करुन किम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.