फोन, घड्याळ, पैशांसह बॅगेची चोरी करून पाचही संशयित पसार
म्हापसा : गोव्यात नोकरीसाठी आलेल्या उत्तराखंडच्या युवकाला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंकुश रावत असे मारहाण झालेल्या पर्यटकांचे नाव असून त्याच्याकडील फोन, घड्याळ, पैशांसह बॅगेची चोरी करून संशयित पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अंकुश रावत याने म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये वस्तू गहाळ झाल्याची तक्रार दाखल केल्याची माहितीही दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंकुश रावत हा युवक दोन दिवसांपूर्वी गावावरून गोव्यात नोकरीच्या निमित्ताने दाखल झाला होता, रात्रौच्या वेळी तो पणजीहून म्हापशाच्या दिशेने रेंट अ बाईक ने जात असताना गाडीतील पणजी पुलावर त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो गाडी बेती भागातून नेत असताना ४-५ अज्ञात व्यक्तींनी त्याच्याकडे सिगरेट मागण्याचे नाटक करून त्याला जबर मारहाण केली.
तसेच त्याच्याकडील फोन, घड्याळ, पैशांसह किमती साहित्य असलेली बॅग घेऊन ५ जणांच्या टोळक्याने पळ काढला. या घडलेल्या प्रकारानंतर अंकुश याने म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
कायदा सुव्यवस्थेला गालबोट-
अंकुश रावत याचे १४ जानेवारीला लग्न झाले असून नोकरीच्या निमित्ताने तो गोव्यात दाखल झाला होता. मात्र गोव्यात येताच त्यांच्या सोबत ही घटना घडली असून या मारहाणीच्या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था चोख नसल्याचे बोलले जात आहे.