एकाला अटक : हातवाडा येथील आगा यांच्या घरावर छापा
पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास प्रक्रियेत भाग घेतलेले उपनिरीक्षक प्रथमेश गावस, सोबत प्रशांत सुतार, गौरेश नाईक व इतर.
वाळपई : वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले पाच गावठी बॉम्ब वाळपई पोलिसांनी ताब्यात घेऊन एकाला अटक केली आहे. बॉम्बचा वापर करून वन्य प्राण्यांची शिकार वाळपई येथील एक व्यक्ती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी संध्याकाळी हातवाडा-वाळपई येथील भाड्याच्या खोलीवर छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळपई जंगल भागात एक इसम गावठी बॉम्बचा वापर करून रानटी जनावरांची शिकार करीत असल्याची माहिती डिचोलीचे उपाधीक्षक जिवबा दळवी यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत रणनीती आखून पथके तयार केली. सोमवारी सायं. ५ च्या सुमारास सदर पथकाने अचानकपणे वाळपई हातवाडा येथील सबदार आगा यांच्या घरावर छापा टाकला. सबदार आगा यांनी सदर घर भाड्यासाठी दिले आहे. त्या घरामध्ये एका खोलीत झाकीर हुसेन हा इसम राहत आहे. त्याच्या खोलीवर ही छापा टाकला असता तेथून ५ गावठी बॉम्ब व रानटी जनावरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलवारी, चॉपर ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित झाकीर हुसेन यांनी सदर क्रुड बॉम्बचा वापर हा रानटी जनावरांच्या शिकारीसाठी करण्यात येत असल्याचे सांगितले. वाळपईचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रथमेश गावस, पोलीस कर्मचारी गौरेश नाईक, प्रशांत सुतार यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
बॉम्ब तपासणी पथकाला पाचारण
गावठी बॉम्ब आढळून आल्यानंतर बॉम्ब तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी याची तपासणी करून सदर बॉम्ब तसेच अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे बॉम्ब तपासणी पथकाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
पाटवळ येथील प्रकरणाचा संशय
पाटवळ या ठिकाणी दीड महिन्यांपूर्वी रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या समद खान याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काहींची जामिनावर सुटका झाली. मात्र, काहीजण अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. रानटी जनावरांच्या शिकार प्रकरणातून सदर घटना घडली होती. गावठी बॉम्बचा पाटवळ येथील प्रकरणाशी संबंध आहे का याची तपासणी पोलीस करणार आहेत.