जनार्दन खोराटे, इतरांविरोधात हणजूण पोलिसांत गुन्हा नोंद

बळजबरीने घरातून हाकलल्याचा सिनारी कुटुंबाचा दावा खोटा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 12:31 am
जनार्दन खोराटे, इतरांविरोधात हणजूण पोलिसांत गुन्हा नोंद

म्हापसा : सेंट मायकलवाडा, हणजूण येथील घरातून गुंडांच्या सहाय्याने बळजबरीने हाकलून लावल्याची तक्रार राजेश सिनारी व त्यांच्या पत्नी  ब्रोंविन सिनारी यांनी हणजूण पोलिसांत केली होती. त्यानुसार जनार्दन खोराटे व इतरांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, आपण या मालमत्तेचे काळजीवाहू (मुखत्यारपत्रदार) आहोत. याप्रकरणी हणजूण पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या, असे स्पष्टीकरण खोराटे यांनी दिले आहे.      

सोमवारी म्हापशात परिषदेत जनार्दन खोराटे यांच्यासमवेत या मालमत्तेचे मालक मायकल पीटर यांचे चुलत बंधू यूकेचे नागरिक डेव्हीड पीटर हे उपस्थित होते. घराचे मालक मायकल पीटर हे यूकेचे नागरिक असून ते कर्करोगग्रस्त आहेत. त्यांनी या मालमत्तेची पॉवर ऑफ अॅटर्नी माझ्याकडे दिली आहे. त्यामुळे पीटर यांचा मी कायदेशीर हक्कदार आहे, अशी माहिती खोराटे यांनी दिली.      

आमच्यावर जे आरोप किंवा आम्ही गुंडांच्या सहाय्याने घरातून वरील कुटुंबीयांना बाहेर काढले, असा खोटा दावा केला जात आहे. यात काहीच तथ्य नाही. पीटरने माझ्याकडे मालमत्तेचे हक्क दिले आहेत. राजेश सिनारी यांचे  कुटुंबीय परस्पर याठिकाणी येऊन राहत आहेत. त्यांना घराच्या चाव्या कुठून मिळाल्या किंवा कुणी परवानगी दिली, याची मला कल्पना नाही. त्यांना घर भाड्याने घ्यायचे असल्यास त्यांनी कायदेशीर मार्गाने समोर येऊन करार करावा. उगाच खोटे आरोप करू नयेत, असे खोराटे म्हणाले.      

दरम्यान, रविवारी राजेश सिनारी व त्यांच्या ब्रिटीश पत्नीने पणजीत पत्रकार परिषद घेऊन आपणास घरातून बाहेर हाकलून लावले. तसेच यावेळी गुंडांचा वापर केला, असा दावा केला होता.

तीस गुंडांनी येऊन बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला घरातून बाहेर काढले, असे जे कुटुंबीय दावा करत आहेत, त्यांनी पुरावे दाखवावे. मी कायद्याचे पालन करणारा रहिवासी असून, वरील मालमत्तेचा कायदेशीर हक्कदार आहे. माझ्याजवळ सर्व कायदेशीर दस्ताऐवज आहेत. ते कुटुंबीय घरात राहत आहेत, त्यांनी स्वतःजवळील कायदेशीर दस्तावेज सादर करावे. —  जनार्दन खोराटे       


हेही वाचा