अपहृत युवतीची दावणगिरी येथून सुटका

कोलवाळ पोलिसांकडून संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 12:29 am
अपहृत युवतीची दावणगिरी येथून सुटका

म्हापसा : माडेल थिवी येथील २७ वर्षीय युवतीला बळजबरीने पळवून नेऊन तिचा छळ केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी मुस्तफा अब्दूल कांचनगर (३४ रा. दावणगिरी कर्नाटक) यास कोलवाळ पोलिसांनी अटक केली. तर पीडित युवतीची मलेबेन्नूर दावणगिरी येथून सुटका केली.      

ही अपहरणाची घटना गेल्या दि. २३ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांत पीडितेच्या बहिणीने तक्रार गुदरली होती. संशयित आरोपी पीडित युवतीला घेऊन दावणगिरी कर्नाटक येथे मूळ घरी गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलीस पथकाने सोमवारी सकाळी मलेबेन्नूर दावनगिरी येथील संशयिताच्या घराच्या खोलीतून पीडित युवतीची सुटका केली. त्यानंतर संशयिताला सायंकाळी कोलवाळ पोलीस स्थानकात आणून रितसर अटक केली.      

दरम्यान, संशयित आरोपी हा फळविक्रीचा व्यवसाय करत होता व तो कोन्सा बोर्ड थिवी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. गेल्या वर्षभरापासून पीडित व संशयित एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, संशयित तिला तिच्या घरी जाऊन वारंवार मारबडव करून धमकी देत होता. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी संशयिताला दोनवेळा अटक केली होती.      

पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू जाधव, प्रकाश घाडी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील व तेजस्वी मडकईकर यापथकाने ही कामगिरी केली.

लग्नानंतरही पीडितेला संशयिताकडून मारहाण

घटनेच्या दिवशी संशयित पीडितेच्या घरी गेला, तिथे तिच्यासह तिच्या कुटुंबीयांशी वाद घातला. प्रेयसीला मारहाण केली. तसेच तिच्या कुटुंबीयांना धमकी देत पीडितेला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेला होता.  मलेबेन्नूर येथे गेल्यावर संशयिताने पीडितेशी लग्न केले. लग्नानंतरही संशयित तिला आपल्या कुटुंबीयांसमवेत मारबडव करत होता, अशी माहिती पीडितेने जबानीवेळी पोलिसांना दिली आहे.  


हेही वाचा