खारीवाडा येथील भंगारअड्ड्याला ठोकले सील

मुरगाव पालिकेची कारवाई : चार जणांनी स्वतःहून बंद केले अड्डे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 12:18 am
खारीवाडा येथील भंगारअड्ड्याला ठोकले सील

वास्को : मुरगाव पालिकेने खारीवाडा येथील एका अवैध भंगारअड्ड्याला सोमवारी (दि.१०) सील ठोकले. दुसऱ्या भंगारअड्डा मालकाने स्वतः आपला भंगारअड्डा बंद केला. तर इतर तीन जणांनी आपले भंगारअड्डे मुरगाव पालिकेची नोटिस मिळाल्यावर बंद केले होते. मुरगाव पालिकेने शहर भागातील सदर भंगारअड्डे बंद करण्यासाठी पावले उचलली होती. पालिकेने आता मांगोरहिल, बायणा, तसेच इतर भागातील भंगारअड्ड्यासंबंधीही पावले उचलण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शहर भागातील खारीवाडा येथे पाच भंगारअड्डे होते. त्या भंगारअड्डा मालकांनी मुरगाव पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. गेली काही वर्षे ते अवैधरीत्या सदर भंगारअड्डे चालवित होते. या भंगारअड्ड्यांमुळे काही समस्या निर्माण होऊ लागल्याने त्यांना ते बंद करण्यासाठी मुरगाव पालिकेने काही महिन्यांपूर्वी नोटिसा पाठविल्या होत्या. त्यावेळी तीनजणांनी त्या नोटिसांना उत्तरे दिली होती. तथापी दोनजणांनी यासंबंधी कोणताही जबाब दिला नव्हता. त्यामुळे त्या भंगारअड्ड्यांना कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. तथापी त्या इशाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते.
मुरगाव पालिकेने सोमवारी त्या अवैध भंगारअड्ड्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यावर संबंधित पालिका अभियंते व कामगार तेथे गेले. त्यावेळी त्या दोन भंगारअड्डा मालकापैकी एकाने स्वतःहून अड्डा बंद केला. तथापी एका मोठ्या अड्डा मालकाने आपला अड्डा बंद करण्याची तयारी न दर्शविल्याने त्याच्या अड्ड्याला कुलूप ठोकण्यात आले.
अड्डामालकाचा नगराध्यक्षांवर दबावाचा प्रयत्न
मुरगाव पालिकेने केलेल्या या कारवाईनंतर त्या अड्डा मालकाने मुरगावचे नगराध्यक्ष तसेच इतर नगरसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तथापी त्याला कोणी बळी पडले नाही. त्यामुळे मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. त्या अड्डा मालकावर कारवाई केल्याबद्दल काहीजणांना वाईट वाटले. त्यामागील कारण समजू शकले नाही. सदर अड्डा मालक तेथे गेल्या बऱ्याच वर्षांपासून भंगारअड्डा चालवित आहे. तथापी त्याने कोणताही परवाना मुरगाव पालिकेकडून घेतला नाही. त्यामुळे पालिकेला कोणताही महसूल मिळालेला नाही. दरम्यान, यापूर्वीच त्याच्यावर कारवाई होण्याची गरज होती. तथापी ती का झाली नाही, हे उघड मात्र गुपित आहे.

हेही वाचा