पाच वर्षांत ४१२ प्रकार : छडा लावण्यात ९६.६० टक्के यश
पणजी : राज्यात मागील पाच वर्षांत ४१२ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यातील चार प्रकरणांतील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर लैंगिक अत्याचार प्रकरणात छडा लावण्यात गोवा पोलिसांना ९६.६० टक्के यश आले, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
या संदर्भात विरोधी पक्ष नेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता. त्यानुसार, २०२० मध्ये ६१, २०२१ मध्ये ७३, २०२२ मध्ये ७४, २०२३ मध्ये ९७, तर २०२४ मध्ये १०७ मिळून राज्यात मागील पाच वर्षांत ४१२ लैंगिक अत्याचारांचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यातील २०२० मध्ये ५९, २०२१ मध्ये ७२, २०२२ मध्ये ७३, २०२३ मध्ये ९३, तर २०२४ मध्ये १०१ मिळून ३९८ प्रकरणात पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. मागील पाच वर्षांत नोंद झालेल्या लैंगिक अत्याचारांपैकी चार प्रकरणांतील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. यात हणजूण पोलीस स्थानकातील दोन, पर्वरी आणि आगशी पोलीस स्थानकांतील प्रत्येकी एक प्रकरणाचा समावेश आहे. तर, ३८ प्रकरणांतील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. तसेच एक प्रकरणातील संशयितांचे निधन झाल्यामुळे न्यायालयाने खटले बंद केले. चार प्रकरणांतील संशयिताची प्रथमदर्शनी पुरावे नसल्यामुळे आरोपातून सुटका करण्यात आली. ३३ प्रकरणांत पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. याशिवाय १४ लैंगिक अत्याचारांचा तपास पोलीस करत आहेत. तर ३१८ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.