गोवा : विजय सरदेसाई ही खरी गोव्याची​ समस्या : मुख्यमंत्री

भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासंदर्भातील ‘त्या’ वक्तव्याचा जाहीर निषेध

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा : विजय सरदेसाई ही खरी गोव्याची​ समस्या : मुख्यमंत्री

पणजी : भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी होती, हा आमदार विजय सरदेसाई यांचा दावा म्हणजे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री ठरलेल्या भाऊसाहेबांचा घोर अपमान आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी आमदार सरदेसाई यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. शिवाय खरी समस्या आमदार सरदेसाई यांच्या फुगलेल्या अहंकाराची आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आम आदमी पक्षाचे (आप) आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची तुलना पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी केली होती. भाऊसाहेबांनी ज्या पद्धतीने गोव्याचा विकास साधला, तसाच विकास डॉ. सावंत यांच्याकडून होत असल्याचे कौतुकही त्यांनी केले होते. यावरून आक्रमक झालेल्या आमदार विजय सरदेसाई यांनी आमदार व्हेंझी व्हिएगश यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. त्यावेळी त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. विलिनीकरणासंदर्भात भाऊसाहेब बांदोडकर यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती असे म्हणत त्यांनी गोव्याच्या अस्मितेच्या विषयालाही स्पर्श केला होता. त्यावरून बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही सरदेसाईंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकास्र सोडले. भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची कधीच अॅलर्जी नव्हती. तरीही आमदार सरदेसाई यांनी अशा आशयाचे विधान करून त्यांचा अपमान केला आहे. भाऊसाहेब बांदोडकर हे उत्तुंग व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी नेहमीच गोव्याची ओळख जपली. राज्याचा विकास साधला. खरी समस्या आहे ती विजय सरदेसाई यांच्या फुगलेल्या अहंकाराची. आपल्यालाच गोव्याची काळजी आहे, हे दाखवण्याची, असा निशाणाही त्यांनी साधला.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांना ‘दलाल’ म्हटल्यानंतर आता विजय सरदेसाईंनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरही टीका केली. यावरून त्यांना गोव्याच्या महान नेत्यांवर टीका करण्याची सवय लागल्याचेच स्पष्ट होते, असे प्रदेश भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले. अर्जेंटिनात जन्मलेल्या आमदार सरदेसाई यांनाच गोव्याची अॅलर्जी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

‘इगो’ मला नाही, मुख्यमंत्र्यांना : विजय

आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी भाऊसाहेब बांदोडकरांशी तुलना केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाच ‘इगो’ जागा झाला. भाऊसाहेबांशी तुलना कोणत्याच मुख्यमंत्र्याशी होऊ शकत नाही, असे मगोचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. यातून आमदार व्हेंझी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा. भाऊसाहेबांनी कूळ-मुंडकार कायदा आणून गोव्याच्या शेत ज​मिनी अबाधित ठेवल्या. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मात्र नवा कायदा आणून इतर राज्यांतील शेतकऱ्यांना या जमिनी विकल्या, असा आरोपही त्यांनी केला. 


हेही वाचा