केरीतील पॅराग्लायडिंग बेकायदा

पर्यटन खात्याकडून स्पष्ट : दुर्घटनेची होणार चौकशी


20th January, 12:29 am
केरीतील पॅराग्लायडिंग बेकायदा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केरी समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेले पॅराग्लायडिंग बेकायदा असून पर्यटन खात्याने कोणत्याही एजन्सीला पॅराग्लायडिंगसाठी परवानगी दिलेली नाही. पॅराग्लायडिंगचा आनंद लुटताना पर्यटकासह ऑपेरटरचा मृत्यू होण्याची घटना दुर्दैवी असून या दुर्घटनेची चौकशी होणार आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे पर्यटन खात्याने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.
शनिवारी केरी समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग करताना पर्यटक शिवानी दाभाळे (२६) आणि ऑपरेटर सुमन नेपाळी (२५) यांचा डोंंगरावर पडून मृत्यू झाला होता. पर्यटनाशी संबंधित मनोरंजन तसेच क्रीडा विषयक प्रकारांना परवाने गरजेचे आहेत. केरीतील पॅराग्लायडिंगला परवाना देण्यात आला नव्हता. पर्यटकांनी नोंदणीकृत वा परवाना असलेल्या पर्यटन सेवांचाच लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन खात्याने केले आहे. पॅराग्लायडिंग परवान्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो. सुविधा तसेच सुरक्षा उपायांचा विचार करून परवाना दिला जातो, असेही पर्यटन खात्याने स्पष्ट केले आहे.
पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा नाेंद
केरी-पेडणे येथे झालेल्या पॅराग्लायडिंग दुर्घटनेप्रकरणी ‘हायक अँड फ्लाय’ या पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायझादा (रा. उत्तरप्रदेश) यांच्याविरोधात मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी झालेल्या अपघातात शिवानी दाभाळे (२७, रा. पुणे) या पर्यटक युवतीसह पॅराग्लायडिंग ऑपरेटर सुमन नेपाळी (२६) यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा तपास करताना ‘हायक अँड फ्लाय’ कंपनीचे मालक शेखर रायझादा यांनी पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांचे संचालन करण्यासाठी पर्यटन खाते व संबंधित विभागांकडून आवश्यक परवानगी घेतलेली नाही, असे आढळून आले आहे. अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी पॅराग्लायडिंगसाठी आवश्यक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करून त्यांनी पर्यटकांचा जीव धोक्यात घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ऑपरेटरकडे पॅराग्लायडिंगसाठीचा परवानाही नव्हता. या प्रकरणी मांद्रेचे पोलीस उपनिरीक्षक परेश काळे यांनी गुन्हा नोंद केला आहे.
ऑपरेटर सुमन नेपाळी आणि पर्यटक शिवानी दाभाळे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडिंगची एक दोरी तुटल्यामुळे दोघेही थेट डोंगरावर पडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायं. ४.३०च्या सुमारास घडली. शवचिकित्सेसाठी दोन्ही मृतदेह गोमेकॉत पाठवले आहेत. शिवानी पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करत होती. एका मित्रासोबत ती गोव्यात पर्यटनासाठी आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलीस करत आहेत.