पॅराग्लायडिंग करणाऱ्या युवतीसह ऑपरेटरचा पडून मृत्यू

केरी समुद्रकिनारी भागातील दुर्घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th January, 11:35 pm
पॅराग्लायडिंग करणाऱ्या युवतीसह ऑपरेटरचा पडून मृत्यू

पेडणे : केरी समुद्रकिनारी पॅराग्लायडिंगचा आनंद लुटणाऱ्या पर्यटक युवतीसह पॅराग्लायडिंग ऑपरेटरचा पडून मृत्यू झाला. पुणे येथील पर्यटक शिवानी दाभाळे (वय २६ वर्षे) आणि पॅराग्लायडिंगचा ऑपरेटर सुमन नेपाळी (वय २५) या दोघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक माहितीनुसार, पॅराग्लायडिंग ऑपरेटर सुमन नेपाळी आणि पर्यटक शिवानी दाभाळे हे दोघेही पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडिंगची एक दोरी तुटल्यानंतर थेट डोंगरावर पडून यात या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली. याबाबतचा गुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला आहे. शवचिकित्सेसाठी दोन्ही मृतदेह बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आले आहेत.

किनारी भागात पॅराग्लायडिंग करण्यासाठी आमचा सुरुवातीपासून विरोध होता. आपणही पर्यटक खात्याला तसे कळवले होते. शिवाय केरी पंचायतीलाही आपण सूचना केल्या होत्या. त्यानुसार केरी पंचायतीने हा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून केरी किनारी भागात पॅराग्लायडिंग करण्यास निर्बंध घालण्याचा ठराव मंजूर केला होता, असे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

पंचायतीचा विराेध

केरी पंचायतीने काही महिन्यांपूर्वी केरी समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करण्यास मनाई करणारा ठराव सर्वानुमते मंजूर केला होता. तो ठराव संबंधित खात्याला सुपूर्द केला असला तरी त्या ठरावावर कारवाई झालेली नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.