प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड; आज होणार घोषणा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत माजी आमदार दामू नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी दामू नाईक यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
मंडळ, जिल्हा अध्यक्षपदांच्या नेमणुका झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या पदाच्या शर्यतीत दामू नाईक यांच्यासह माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे आणि वरिष्ठ नेते दत्ता खोलकर हे सात नेते होते. त्यात दामू नाईक यांनी बाजी मारली. भाजपातील संघटनात्मक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत असतात. त्यामुळे मंडळ, जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध झाली.
दरम्यान, मावळते प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा कार्यकाळ गतवर्षीच संपुष्टात आला होता; परंतु लोकसभा आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे देशभरातील इतर राज्यांप्रमाणेच भाजपच्या गोव्यातील संघटनात्मक निवडणुकाही पुढे ढकलल्या. त्यामुळे तानावडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून मुदतवाढ देण्यात आली होती. या दरम्यान, तानावडे यांची पक्षाने राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर खासदार आणि प्रदेशाध्यक्ष या दोन्हीही पदांचा भार ते पेलत होते.
दामू नाईक सरस ठरल्याची कारणे
भाजपचे केडर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित
पक्षाचे तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध
राज्यात भंडारी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भंडारी समाजाची मते निर्णायक ठरत असतात. दामू नाईकही भंडारी समाजाचे आहेत.
दामोदर नाईक यांचा राजकीय प्रवास
२००० ते २००२ पर्यंत फातोर्डा भाजप मंडळाचे सरचिटणीस
२००२ ते २०१२ पर्यंत फातोर्ड्याचे आमदार
२००२ ते २००५ पर्यंत हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष
२००२ ते २००६ पर्यंत प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष
२००६ मध्ये भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य
२०१२ पासून आजपर्यंत प्रदेश भाजपचे सरचिटणीस आणि प्रवक्ते
३१ जुलै २०१२ ते जानेवारी २०१७ आणि २७ ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ असे दोनवेळा मडगावातील रवींद्र भवनचे अध्यक्ष
एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१६ या काळात मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष
नवे कार्यकर्ते जोडून संघटन वाढवणार : नाईक
जगात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा प्रदेशाध्यक्ष होणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भाजपच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांच्या जोरावर राज्यात पक्ष मोठा झाला. यापूर्वीच्या सर्वच प्रदेशाध्यक्षांनी पक्षाला बळकटी मिळवून दिली. त्याच पद्धतीने आगामी काळात नवे कार्यकर्ते जोडून पक्षाचे संघटन वाढवण्यावर आणि आगामी सर्वच निवडणुका जिंकण्यावर माझा भर असेल, अशी प्रतिक्रिया दामू नाईक यांनी प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर दिली.
मावळते अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून दर्जेदार कामगिरी केली. पक्षाच्या नियमानुसार आता दामू नाईक यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली आहे. पक्ष संघटन वाढवण्यासाठी दामू नाईक निश्चित चांगले काम करतील, याचा मला विश्वास आहे.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री