राष्ट्रीय समुद्र विज्ञान संशोधन संस्थेचा ६०वा वर्धापन
पणजी : शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी समुद्र, महासागरात अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी व्यक्त केली. शुक्रवारी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संशोधन संस्थेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. सुशील कुमार, राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. शैलेश नायक व अन्य अधिकारी उपस्थित होते. डॉ. रविचंद्रन यांनी सांगितले की, मानवाने आतापर्यंत केवळ ५ टक्केच खोल समुद्रात संशोधन केले आहे. अजून ९५ टक्के भागात संशोधन होणे आवश्यक आहे. असे झाल्यास माशांसह अन्य संसाधने अधिक प्रमाणात मिळतील. जगातील ७२ टक्के असलेला महासागर मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला अन्न, खनिजे मिळतात. पृथ्वीवरील बहुतेक प्राणवायू समुद्री सूक्ष्म जीव तयार करतात. पृथ्वीचे हवामान समुद्र नियंत्रित करतो. तसेच पर्यटन, जल वाहतूक, सुरक्षा प्रदान करण्यासाठी देखील महासागर उपयुक्त आहे.
समुद्रातील कचऱ्याचे प्रमाण वाढले!
समुद्री पर्यावरणाची हानी न करता शाश्वत विकास झाला पाहिजे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. समुद्रातील कचऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे. याशिवाय त्सुनामी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती देखील आहेत. यासाठी केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरण निर्माण होणे आवश्यक आहे. पृथ्वी विज्ञान खाते तसेच एनआयओद्वारे करण्यात येणारे संशोधन आपल्या ज्ञानात मोलाची भर घालत आहे, असे रविचंद्रन म्हणाले.