अश्लील व्हिडिओ प्रकरणातील संशयित कुकेश रावताला सशर्त जामीन मंजूर

सशर्त जामीनावर म्हापसा न्यायालयाने केली सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th December 2024, 04:51 pm
अश्लील व्हिडिओ प्रकरणातील संशयित कुकेश रावताला सशर्त जामीन मंजूर

म्हापसा: मॉर्फ केलेल्या अश्लील व्हिडिओच्या आधारे काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणातील संशयित आरोपी कुकेश रावता (रा. मूळ ओडिशा) याची सशर्त जामीनावर म्हापसा न्यायालयाने सुटका केली.

गुरुवारी १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी म्हापसा प्रथम न्यायालयाने संशयित आरोपीची २० हजार रुपये हमी रक्कम आणि तितक्याच रक्कमेच्या हमीदाराच्या हमीनुसार जामीन अर्ज मंजूर केला. शिवाय संशयिताला इतर अटी लागू करण्यात आल्या आहेत.

बुधवारी ११ रोजी या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली होती व निकाल राखून ठेवण्यात आला होता. संशयिताच्या वतीने अ‍ॅड. कपिल केरकर तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील तेजस पवार यांनी युक्तीवाद केला. तसेच देविदास पणजीकर या हळदोणातील मतदाराची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने बुधवारीच फेटाळून लावली होती. त्यांच्यावतीने अ‍ॅड. विनायक पोरोब यांनी युक्तीवाद केला होता.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी याप्रकरणी गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. तर संशयिताला गुन्हा शाखेने एक वर्षानंतर म्हणजे २ डिसेंबर २०२४ रोजी अटक केली होती. संशयित सध्या कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता.

संशयिताने फिर्यादीकडे ५ लाखांची खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास हा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी फिर्यादीला दिली होती. सुरूवातीला ५५ हजार रुपये फिर्यादीने संशयिताला खंडणीच्या स्वरूपात दिले होते. त्यानंतर संशयिताने ५ कोटींची खंडणी मागितली होती.

२ डिसेंबर रोजी संशयित कुकेश रावता यास गुन्हा शाखेने अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडी केली होती. पोलिसांनी संशयिताकडील मोबाईल फोन देखील जप्त केला होता. असे असताना संशयिताकडील तो मॉर्फ व्हिडिओ वायरल झाल्याने राज्यातील राजकारणात हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे.

हेही वाचा