एसएफएक्स युवा, एसएफएक्स लेडीजचा विजय

धुळेर-म्हापसा येथे प्रदर्शनी फुटबॉल सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th December 2024, 12:42 am
एसएफएक्स युवा, एसएफएक्स लेडीजचा विजय

म्हापसा : सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चच्या फेस्तनिमित्त धुळेर-म्हापसा येथे एसएफएक्स यूथच्या सहकार्याने एसएफएक्स वेटरन्स आणि एसएफएक्स यूथ यांच्यात एक प्रदर्शनी फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुण प्रतिभांचा सन्मान करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात एसएफएक्स वेटरन्स आणि एसएफएक्स यूथ यांच्यातील रोमांचक फुटबॉल सामन्याने झाली. दोन्ही संघांनी चांगली लढत देत आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. परंतु एसएफएक्स युथने सामन्यात २-० असा विजय मिळवला. मध्यांतरादरम्यान, एसएफएक्स लेडीज आणि एसएफएक्स गर्ल्स युथ यामध्ये दुसरा सामना खेळविण्यात आला. हा सामना टायब्रेकर खेळवला गेला. ज्यामध्ये एसएफएक्स लेडीजने २-१ ने विजय मिळविला.
या प्रदर्शनीय सामन्यातील विजयी आणि पराभूत दोन्ही संघांना रोख बक्षिसे आणि पदके देण्यात आली. सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात आली, तर महिला संघांना पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
दहा युवा यशवंतांचा सत्कार
यावर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १० युवा यशवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्य सरकारच्या विद्युत खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोवा वीज खाते, म्हापसा येथील सहाय्यक अभियंता सॅव्हियो फर्नांडिस आणि म्हापसा पालिका प्रभाग १चे नगरसेवक आनंद भाईडकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा