जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात साजरे
पणजीः साधारणतः डिसेंबरपासून गोव्यात पर्यटकांची वर्दळ सुरू होते. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पर्यटन क्षेत्राला गालबोट लावण्याची घटना हरमल मधून समोर आली. एका हॉटेलमध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आला. एस्कॉर्ट वेबसाईटवरून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या प्रकरणात बार्देश तालुक्यातील तीन टॅक्सी चालकांना पोलिसांनी चौकशीची नोटीस पाठवली आहे. विद्यमान आमदाराचा एका महिलेबरोबर मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनाम करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यासोबतच किटला हळदोणा येथे वृद्ध बहीण, भावाचा संशयास्पद मृत्यू, मांद्रे पंच महेश कोनाडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला अशा गुन्हेगारी घटनांनी आठवडा गाजला.
तर दुसरीकडे बहुचर्चित सनबर्न महोत्सव धारगळमध्येच आयोजित करण्यावर पंचायतीच्या बैठकीत ५ विरुद्ध ४ मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. तसेच जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात साजरे करण्यात आले. एसटी समुदायासाठी दिलासादायक बाब म्हणून राजकीय आरक्षण विधेयक संसद अधिवेशनात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवार
• हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय; ग्राहक बनून पोलिसांचा छापा
पेडणे : हरमल येथे एका हॉटेलमध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश हरमल पोलिसांकडून करण्यात आला. वेश्या व्यवसा- यप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांना यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अहमदनगर (गुजरात) येथील एका महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वेश्या व्यवसाय प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही महिलांना मेरशी येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
सोमवार
• बेंदोर्डे - पोळेपर्यंतच्या रस्त्याचे होणार चौपदरीकरण
पणजी : राष्ट्रीय महामार्गाच्या बेंदोर्ड ते पोळे या काणकोण बायपासला जोडणाऱ्या २२.१० किमी लांबीच्या चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या केंद्राने १,३७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रस्त्याच्या चौपदरीकरणा- मुळे काणकोण-कुंकळ्ळी आणि मडगाव मार्गांची जोडणी सुधारेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी द्वीट करून ही घोषणा केली
• काणकोणात जी.आय.एस प्रणालीतर्फे आजपासून सर्वेक्षण
काणकोण : गोव्याच्या शहर विकास केंद्रातर्फे काणकोण पालिकेच्या १२ ही प्रभागांचे सर्वेक्षण जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) तर्फे करण्यात येणार असून या सर्वेक्षणात पालिका क्षेत्र, प्रभाग क्षेत्र, प्रभागातील व्यक्तीच्या राहणीमानाचे सर्वेक्षण त्याच्याजवळ असलेल्या जमिनी व इतर साधनांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे आवाहन काणकोणच्या नगराध्यक्षा सारा देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.
मंगळवार
• भाडे भरण्यासंबंधी पणजी मार्केटमधील ४०० व्यापाऱ्यांना नोटीसा
पणजी : अनेक वर्षांपासून गाळ्यांचे भाडे न भरलेल्या पणजी मार्केटमधील सुमारे ४०० व्यापाऱ्यांना महापालिकेने (मनपा) नोटिसा जारी करत प्रलंबित भाडे सात दिवसांत भरण्याचे आणि न भरल्यास गाळे खाली करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे भाडे न भरणाऱ्यांवर मनपा खरेच कारवाई करणार की दरवेळीप्र- माणे यावेळीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार, याकडे स्थानिकांच्या नजरा लागून आहेत.
• सनबर्न धारगळातच
पेडणे : 'सनबर्न' महोत्सव धारगळमध्येच आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव सोमवारी झालेल्या पंचायतीच्या बैठकीत ५ विरुद्ध ४ मतांनी मंजूर करण्यात आला. बैठकीवेळी पंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बैठकीनंतर सरपंच सतीश धुमाळ म्हणाले की, 'सनबर्न 'विषयी घेतलेल्या सभेत महोत्सव आयोजित करण्याचा ठराव मंजूर केला होता. या सभेला ग्रामस्थांसह सत्तारूढ गटाचे पंच उपस्थित होते.
• दुहेरी रेल्वेमार्गावरून वेळसांवची सभा गाजली
वास्को : दुहेरी रेल्वेमार्गावरून वेळसावची ग्रामसभा आरोप प्रत्या- रोपांनी गाजली. वेळसावच्या सरपंच मारिया गौव्हेला यांनी दुहेरी रेल्वेमा- र्गासंबंधीची भूमिका बदलून नरमाईचे धोरण स्वीकारल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. तथापी आपल्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही लोकांना त्रास होऊ देणार नाही आणि दुहेरी रेल्वेमार्गाचे समर्थनही करणार नसल्याचे सरपंच मारिया यांनी सांगितले.
• जुने गोवेत फेस्ताला उत्साहात सुरूवात
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर हे देवाच्या वचनाचे खरे उपदेशक आहेत, असे उद्गार आर्च बिशप लुईस आंतोनियो कार्डिनल यांनी काढले. जुने गोवे येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या फेस्तदरम्यान मासचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार
• एस्कॉर्ट वेश्याव्यवसाय; ३ टॅक्सी चालक सहभागी
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने एस्कॉर्ट वेबसाईटवरून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात चार संशयितांना अटक केली होती. या प्रकरणात सहभाग असल्यावरून गुन्हा शाखेने बार्देश तालुक्यातील टॅक्सी चालक इमाम सुतार (रा. उसकई-पालये), उमेश बगळी (रा. बेती) आणि झीशान अली शेख (रा. मरड-महापसा) यांना संशयित केले आहे. वरील तिघांना चोकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
• एसटींना राजकीय आरक्षण विधेयक येणार संसद अधिवेशनात
पणजी : संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात गोव्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षण देण्या- बाबतचे विधेयक येणार आहे. संसद अधिवेशनात येणाऱ्या १६ विधेयकांच्या यादीत या विधेयकाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एसटी समुदायाची अनेक वर्षांची मागणी २०२७ मधील विधानसभा निवडणुकीत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
• देवस्थान कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती बारगळली
पणजी : वर्षभरापूर्वी राज्य सरकारने विचारात घेतलेली देवस्थान कायदा दुरुस्ती सध्या गुंडाळल्यात जमा आहे. गोव्यातील अनेक मंदिरांच्या महाजनांमध्ये असलेल्या वादांमुळे देवस्थान कायद्याला सध्या हात लावायचा नाही, असेच सरकारने ठरवले आहे.
• सुनीता रॉड्रिग्जला 'ईओसी' आज बजावणार दुसऱ्यांदा नोटीस
पणजी : १३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यातील संशयित मायरन रॉड्रिग्ज याची पत्नी सुनीता रॉड्रिग्ज हिला चौकशीसाठी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागातर्फे (ईओसी) बुधवारी उपस्थित राहण्यासाठी दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येणार आहे.
• मांद्रे पंच महेश कोनाडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला
पेडणे : मांद्रेचे पंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी आस्कावाडा येथील त्यांच्या घरानजीक कारमधून आलेल्या पाच बुरखाधारींनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी सळ्यांनी मारहाण करण्यात आली. जखमी कोनाडकरांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार मायकल लोबो, माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासह अनेकांनी कोनाडकर यांची विचारपूस केली. लोबो, सोपटेंसह काहींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हल्लेखोरांना २४ तासांत अटक करण्याची मागणी केली.
गुरुवार
• मॉर्फ व्हिडिओ व्हायरलची धमकी; आमदाराकडे मागितले ५ कोटी
पणजी : गोव्यातील विद्यमान आमदाराचा एका महिलेबरोबर मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनाम करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी गुन्हा शाखेने कुकेश राऊता (२५, रा. ओडिसा) या संशयिताला गुजरातमधून अटक केली. संशयिताने आतापर्यंत संबंधित आमदाराकडून पाच लाख रुपये खंडणी उकळली.
• मायरनसह पत्नींच्या बँकेतून ३ कोटींचे दागिने जप्त
पणजी : फातोर्ड मडगाव ते लंडनपर्यंत प्रकरणाची व्याप्ती असलेले आणि १३० कोर्टीच्या गुंतवणूक घोटाळ्यातील संशयित मायरन रॉड्रिग्ज याच्यासह त्याची पहिली पत्नी सुनीता आणि दुसरी पत्नी दीपाली परब मिळून तीन बँक लॉकरातून ३ कोटी रुपयांचे ४.१२५ किलो दागिन्यांसह मालमत्तेचे अस्सल कागदपत्रे जप्त केले. ही कारवाई गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाचे (ईओसी) निरीक्षक राजाशद शेख याच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी रात्री उशिरा केली.
• १७ लाखांच्या अपहारप्रकरणी फरार लिपिकाला अटक
मडगाव : मडगाव पालिकेच्या महसुलाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी करणाऱ्या फरार कनिष्ठ लिपिक योगेश शेटकर याला मडगाव पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शुक्रवार
• किटला हळदोणा येथे वृद्ध बहीण, भावाचा संशयास्पद मृत्यू
म्हापसा : किटला हळदोणा येथे सख्ख्या भाऊ-बहिणीचे मृतदेह संश- यास्पद स्थितीत सापडले सेबेस्तीयन कार्बोज (६८) व अवलिना कार्टोज (७२) जशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडला असून सेबेस्तियन याने बहीण अवलिना हिचा विष पाजून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
• सोन्याच्या पेढीवरून फरार झालेल्या कारागिरांकडून १४. ८३ लाखांचे सोने जप्त
मडगाव : कोंब मडगाव येथे वितळलेल्या सोन्याचे दागिने करणाऱ्या तिघा कारागिरांनी ७२ लाखांचे ९५९ ग्रॅम सोने घेऊन पळ काढला होता. हाब्रा कोलकाता येथून तिन्ही संशयितांना अटक करत मडगावात आणण्यात आले. त्यांच्याकडून १४.८३ लाखांचे सोने जप्त करण्यात आले. न्यायालयाकडून तिघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मडगाव येथील प्रितेश लोटलीकर यांनी कारागिरांनीच सोन्याची चोरी केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
• रापणीत भरतीचे पाणी भरल्यानेच करंझाळे किनारी मृत माशांचा खच
पणजी : मच्छीमारांनी लावलेल्या रापणीत भरतीचे पाणी भरल्यानेच मासे मरण पावले. या रापणीत मृत झालेले मासे मच्छिमारांनी करंजाळे समुद्रकिनारी तसेच टाकून दिले असून प्रदूषणामुळे एकही मासा मरण पावला नसल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. करंझाळे किनारी मृत माशांचा खच निर्माण झाल्याची घटना घडली होती.
शनिवार
• मॉर्फ केलेला अश्लील व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल
गोव्यातील विद्यमान आमदाराचा एका महिलेबरोबरचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही व्हिडिओ जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले असून मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित आमदाराने राजीनामा द्यावा अशी मागणी हळदोण्याचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी केली.