तिसवाडी : सोमवारपर्यंत एसआयटी स्थापन न केल्यास घरोघरी जाऊन आंदोलन : काँग्रेसचा इशारा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
14th November 2024, 02:38 pm
तिसवाडी : सोमवारपर्यंत एसआयटी स्थापन न केल्यास घरोघरी जाऊन आंदोलन : काँग्रेसचा इशारा

पणजी : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्याप्रकरणी  सोमवारपर्यंत निवृत्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती(एसआयटी)स्थापन न केल्यास काँग्रेस पक्ष घरोघरी जाऊन भाजपचे कारनामे उघडे करणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिना आदी उपस्थित होते. 

सरकारी नोकरीचे आमिष दाखवत सामान्यांकडून पैसे उकळण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काँग्रेस पक्षाने यापूर्वीच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र भाजप सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामध्ये काही संशयित भाजप पक्षाशी संबंधित आहेत. भाजप सरकार गोव्यातील तरुण मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. यामध्ये उच्च पदस्थ व्यक्ती गुंतल्या असण्याची शक्यता आहे असे पाटकर म्हणाले. 

राज्यात बेरोजगारी वाढली असल्याने प्रत्येक गोवेकर नोकरीसाठी तळमळत आहे. गोव्यातील पारंपरिक उद्योगधंदे सरकारने बंद पाडले. अशात या प्रकरणांमुळे लोकांना आपल्याला न्याय मिळणार नाही असेच वाटत आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पैसे घेणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करून लोकांचे पैसे परत दिले जातील असे सांगितले. अशी तरतूद कोणत्या कायद्यात आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. मुख्यमंत्र्यांनी लोकांना खोटा आशावाद दाखवू नये असेही ते यावेळी म्हणाले. 

विविध केंद्रीय संस्थांच्या अहवालानुसार बेरोजगारीत गोवा पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रातील भाजप सरकारनेच ही आकडेवारी जारी केली आहे. असे असले तरी राज्यातील भाजप सरकार हे मानायला तयार नाही. राज्यात पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या विकता याव्यात यासाठीच  रोजगाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याची शंका निर्माण झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी एसआयटी स्थापन करणे गरजेचे आहे असे युरी आलेमाव म्हणाले . 

नार्को चाचणी करायला हवी 

हे प्रकरण कर्करोगासारखा फैलावत आहे. याची चौकशी एसआयटी मार्फतच झाली पाहिजे. यात गुंतलेल्या संशयित लोकांची नार्को चाचणी करायला हवी तरच सत्य समोर येईल असे मत रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.

हेही वाचा