गोवा। परराज्यांतील ट्रॉलर्सच्या मासेमारीमुळे गोमंतकीयांच्या ताटात केवळ बांगडेच

मोठे मासे मिळत नसल्याची मच्छीमारांकडून खंत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th November, 11:59 pm
गोवा। परराज्यांतील ट्रॉलर्सच्या मासेमारीमुळे गोमंतकीयांच्या ताटात केवळ बांगडेच

पणजी : राज्याबाहेरील ट्रॉलर्स गोव्यातील समुद्रात येऊन सर्व मासे घेऊन जातात. यामुळे बांगड्यांशिवाय इतर कोणतीही मासळी आमच्या जाळ्यात अडकत नाही. मोठे आणि चांगले मासे हे परराज्यातील ट्रॉलर्स घेऊन जातात. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता यात लक्ष घातल्यामुळे अशा ट्रॉलर्सवर ताततडीने कारवाई करण्यात येते, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.


परराज्यातील ट्रॉलर्स राज्यात येऊन मासेमारी करत असल्याने हे प्रकरण बरेच तापत होते. याबाबत स्थानिक मच्छिमारांनी अनेकवेळा मत्स्यमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. गेल्या आठवड्यात मालपे (कर्नाटक) येथील दोन ट्रॉलर निर्ला येथील मच्छिमारांनी पोलिसांच्या मदतीने पकडून मत्स्य खात्याच्या ताब्यात दिले होते.

या परप्रांतीय ट्रॉलर्सच्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळणे कठीण बनत आहे. आम्ही आधी माणकी, सौंदाळे, इसवण व विविध मासळी पकडत होतो मात्र ते आता पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात येत नाहीत. समुद्रात फक्त बांगडे आणि तारले शिल्लक आहेत. गोव्यात बाहेरील ट्रॉलर्स आले की ते सर्व मासे जाळ्यात ओडून नेतात, अशी खंत पारंपरिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

जेव्हा आम्हाला मोठे बांगडे मिळतात तेव्हा आम्ही ते २५०, ३०० ते ४०० रुपयांपर्यंत विकतो. ५०० रुपयांच्या वर आम्ही जात नाही. याचा फायदा गोव्यातील जनतेला आणि सरकारला होतो. ट्रॉलरमधील बांगडे महाग असून एका टोपलीसाठी २,५०० ते ४,००० रुपये मोजावे लागतात. पारंपरिक मच्छीमार गोव्याला ताजे मासे देतात. यात फोर्मेलीन ‘बी’ नावाचे रसायन वापरलेले नसते, असे पेल म्हणाले.

बाणावली येथील मच्छीमार पेले फर्नांडिस म्हणाले की, सध्या मंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे एका फोनवरच पोलीस अशा ट्रॉलर्सवर कारवाई करण्यासाठी हजर होतात, मात्र काही वेळा परराज्यातील हे ट्रॉलर्स मासेमारी करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी विनंती पेले यांनी केली.