गोवा : हॉली रॉड्रिग्ज, जेनिफर फर्नांडो, ट्रेसी डायस यांना तियात्र अकादमीचे युवा सृजन पुरस्कार

१६ नोव्हेंबर रोजी मडगावातील रवींद्र भवनात पुरस्कार वितरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th November 2024, 12:55 am
गोवा : हॉली रॉड्रिग्ज, जेनिफर फर्नांडो, ट्रेसी डायस यांना तियात्र अकादमीचे युवा सृजन पुरस्कार

पणजी : हॉली रॉड्रिग्ज, जेनिफर फर्नांडो आणि ट्रेसी डायस या तरुण तियात्रिस्तांना यंदाचे तियात्र अकादमी गोवाचे युवा सृजन पुरस्कार जाहीर झाले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी मडगावातील रवींद्र भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, असे गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँथनी बार्बोझा यांनी सांगितले.
हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी गोवा तियात्र अकादमीने पणजीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बार्बोझा यांच्यासमवेत अकदामीचे परिषद सदस्य सुकोर फर्नांडिस, आंतोनियो रॉड्रिग्ज, आमरोज फर्नांडिस, ज्योकीम डायस आणि सदस्य सचिव सुरेश दिवकर उपस्थित होते.
१६ नोव्हेंबर रोजी रेजिना फर्नांडिस यांच्या जंयतीनिमित्त तियात्र अकादमीची स्थापना झाल्यापासून दरवर्षी युवा तियात्रिस्त ज्यांनी तियात्र क्षेत्रात खूप कार्य केले आहे, त्यांना युवा सृजन पुरस्कार दिले जातात. १८ ते ३५ वर्षे वयाच्या तियात्रिस्तांना हे पुरस्कार दिले जातात. या वर्षाच्या पुरस्कारासाठी पुरुष तियात्रिस्तांनी चार अर्ज केले होते तर महिला तियात्रिस्तांनी एकही अर्ज केलेला नाही. पुरुष श्रेणीत आलेल्या चार अर्जांमधून हॉली रॉड्रिग्ज यांची युवा सृजन निवड झाली, असे बार्बोझा यांनी सांगितले.
महिला श्रेणीत एकही अर्ज आलेला नसल्याने अकादमीच्या सर्वसाधारण परिषद समितीकडे या पुरस्कारासाठी तियात्रिस्तांची निवड करण्याचा अधिकार आहे. यामुळे या समितीने दोन पुरस्कार महिला श्रेणीत द्यायचे ठरवले आहे. जेनिफर फर्नांडिस आणि ट्रेसी डायस (ट्रेसी दे कळंगुट) यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, अशी माहिती बार्बोझा यांनी दिली.
१६ नोव्हेंबर रोजी मडगावातील रवींद्र भवनाच्या ब्लॅक बॉक्समध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध तियात्रिस्त आणि चित्रपट अभिनेत्री एस्त्रेल नोऱ्होन्हा प्रमुख पाहुण्या असणार आहेत आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध तियात्रिस्त शॅरोन माझारेल्लो हे सन्माननीय पाहुणे या नात्याने उपस्थित असतील, असे बार्बोझा यांनी सांगितले.

जास्तीत जास्त सहभागासाठी प्रयत्न!

या पुरस्कारासाठी फक्त पुरुषांनी चार अर्ज करणे आणि महिलांनी एकही अर्ज केलेला नाही, यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर बार्बोझा यांनी या पुरस्कारांना योग्य प्रतिसाद मिळालेला नाही हे त्यांनी मान्य केले. यापुढे जास्तीत जास्त युवकांची निवड व्हावी, यासाठी ठोस कार्यवाही हाती घेतली जाईल, असे बार्बोझा म्हणाले.

हेही वाचा