‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणार नवीन विक्रम : ‘अमेझिंग गोवा’ संमेलनातील उपक्रम
कुणबी साडी विणताना कामगार.
पणजी : येथे सुरू असलेल्या अमेझिंग गोवा संमेलनात एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येथे हातमागावर आतापर्यंतची सर्वांत मोठी कुणबी साडी विणण्यात येत आहे. ही साडी १०० मीटर लांबीची असेल. उपक्रम यशस्वी झाल्यास त्याची ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नवीन विक्रम म्हणून नोंद होणार आहे. या आधी हातमागावरील सर्वांत मोठ्या कुणबी साडीची लांबी ४० मीटर आहे.
हा उपक्रम राय येथील ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीतर्फे केला जात आहे. याबाबत अकादमीच्या संचालिका डॉ. स्नेहा भागवत यांनी सांगितले की, अकादमीतर्फे कुणबी साड्या तसेच अन्य साहित्य बनविले जाते. काही दिवसांपूर्वी व्हायब्रंट गोवातर्फे आम्हाला सर्वांत मोठी कुणबी साडी करण्याबाबत विचारणा झाली होती. उपक्रम चांगला असल्याने आम्ही त्यास होकार दिला. सध्या साडी विणण्याचे काम अकादमीतील कलाकार तसेच फॅशन डिझाईनचे विद्यार्थी करत आहेत.
९७ टक्के काम पूर्ण!
गेल्या काही वर्षांत कुणबी साडीची लोकप्रियता वाढली आहे. गोव्यासह अन्य राज्यातून देखील याची मागणी वाढली आहे. या स्थानिक कलेला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही हा विक्रम करत आहोत. सध्या या साडीचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत १०० मीटर लांबीची कुणबी साडी तयार होईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.