बार्देश : पर्वरीतील वड वाचवण्यासाठी एकवटले पर्यावरणप्रेमी, नागरिक

उड्डाणपुलासाठी वृक्ष हटविण्याची शक्यता : खाप्रेश्वर देवस्थानामुळे स्थानिकही नाराज

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th November 2024, 12:52 am

पर्वरीतील श्री खाप्रेश्वर देवस्थानचा जुना वड. (समीप नार्वेकर)

पणजी :
पर्वरी उड्डाणपुलाच्या कामामुळे या भागातील ‘वडाकडे देवस्थान’च्या १०० वर्षांपूर्वीच्या महाकाय वडाच्या झाडाचा बळी जाणार आहे. हा वड वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी, नागरिक एकवटले आहेत. हा वड म्हणजे एक श्रद्धास्थान आहे. यामुळे या वडाला वाचवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पर्वरीतील जेएमजे हॉस्पिटजवळ श्री खाप्रेश्वर देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या घुमटीला लागूनच एक मोठा वड आहे. अनेक विधी, पूजा, सण या खाप्रेश्वर देवस्थानमध्ये होतात आणि खाप्रेश्वर हा गावचा राखणदार म्हणून अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे वडाचे झाड कापल्यास लोकांच्या श्रद्धेवर आणि धार्मिक भावनांवर आघात होणार, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सीमेवरील देवस्थान दुसरीकडे कसे नेणार?
हा वड दुसरीकडे नेण्याचा कंत्राटदाराचा विचार आहे. हा वड तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुळापासून उपटून त्या जागेवरून ५ किलोमीटर दूर सांगोल्डा गावात रोपण करण्याचा विचार सुरू आहे. पण हा वड देवस्थानचा असल्यामुळे तो स्वयंभू आणि धार्मिक विधीचा भाग आहे. हा वड तेथून हलविल्यावर पूर्ण देवस्थानच दुसऱ्या जागेवर नेण्यासारखे होईल, म्हणून देवस्थान समितीनेही याला विरोध केला आहे.

हा भव्य आणि दिव्य असा वड कापला जाण्याच्या मार्गावर आहे. हा वड वाचवावा, अशी माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे. जर आम्ही आमची बुद्धी वापरली तर हे झाड वाचवणे कठीण नाही. या वडाभोवती अनेक धार्मिक विधी होतात. हा वड आम्ही वाचवू शकतो. जर शक्य नसेल, तर तो स्थलांतरित करावा.
- डॅनियल डिसोझा, पर्यावरणप्रेमी

हेही वाचा