बार्देश : म्हापसा नगराध्यक्षांच्या पतीच्या नावे दुकान हस्तांतरावरून गदारोळ

पालिकेची बैठक पुन्हा तहकूब : मुख्याधिकारी, नगरसेवकांमध्ये बाचाबाची

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th November 2024, 12:51 am
बार्देश : म्हापसा नगराध्यक्षांच्या पतीच्या नावे दुकान हस्तांतरावरून गदारोळ

म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांमध्ये दुकान हस्तांतर मुद्द्यावर झालेली बाचाबाची. (उमेश झर्मेकर)

म्हापसा :
येथील पालिकेच्या मालकीची दोन दुकाने कागदोपत्री फेरफार करून आपल्या पतीच्या नावावर एकत्रितपणे हस्तांतरित करण्याच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या बेकायदा प्रकारावरून म्हापसा पालिका मंडळाची बैठक वादळी ठरली. रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे सात तास चाललेली ही बैठक पुन्हा तहकूब झाली. आता ही बैठक येत्या दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
शुक्रवारी दुपारी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दुकान भाडेकरू करारपत्र नूतनीकरण आणि हस्तांतर मुद्दा बैठकीत नगराध्यक्षांनी चर्चेसाठी आणला. हा मुद्दाच प्रत्यक्षात चुकीचा असून सरकारने भाडेकरू करारपत्र नूतनीकरण व रक्ताच्या नात्याच्या व्यक्ती​च्या नावे दुकान हस्तांतराला बंदी घातली आहे, असा दावा करत नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी यास आक्षेप घेतला.
नगराध्यक्षांनी मूर्खपणा केल्याचा आरोप करून भिवशेट यांनी लेखी हरकत पत्र सादर केले. मात्र नगराध्यक्षांनी सदर हरकतपत्र घेण्यास नकार दिला. तसेच मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर हे आपल्या आसनावरून उठले व भिवशेट यांच्या विधानाला त्यांनी हरकत घेतली. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी भिवशेट यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर, विराज फडके व शुभांगी वायंगणकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेरले. त्यानंतर आपल्या नातेवाईकांचा विषय अजेंड्यावर चर्चेला आल्याने नगराध्यक्ष बिचोलकर यांनी या मुद्द्यावरून स्वत:ला बाजूला ठेवत बैठकीची सूत्रे उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर यांच्याकडे दिली.
दरम्यान, म्हापशातील सेंट झेवियर कॉलेज मैदानाचा आयडीएमटी योजनेअंर्तगत विकास करण्याचा उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी मांडलेला प्रस्ताव चर्चेवेळी ८ वि. ७ मतांनी मंजूर करण्यात आला, तर तीन नगरसेवक तटस्थ राहिले. नगराध्यक्षांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.

कंत्राटी नोकर भरतीचा ठराव नामंजूर
कंत्राटी नोकर भरतीचा ठराव इतिवृत मंजुरीवेळी ११ वि. ७ मतांनी नामंजूर करण्यात आला. इतिवृत्त मंजूर न करता केलेल्या याच नोकर भरतीच्या प्रकरणावरून गेल्या दि. ३० आक्टोबर रोजी पालिका मंडळाची बैठक तहकूब झाली होती. हा ठराव फेटाळण्यात आल्यामुळे पालिकेला त्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनावेतन घरी पाठवावे लागणार आहे.

दोन दुकाने एकच असल्याचे भासविले...
- उपनगराध्यक्ष हरमलकर यांनीही मुख्याधिकाकाऱ्यांच्या सूचनेवरून हरकतपत्र स्वीकारण्यास नकार दिला. मात्र नगरसेवकांच्या दबावामुळे नाईलाजास्तव हे हरकतपत्र त्यांना नोंद करून घ्यावे लागले व त्याची रिसिव्ह कॉपी भिवशेट यांना दिली. त्यानंतर भिवशेट यांनी अर्जदार दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांच्या जुन्या मार्केटमधील (अलंकार थिएटर जवळील) दुकान हस्तांतराच्या फाईलचे वाचन केले.
- कृष्णा दत्ताराम बिचोलकर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मीना बिचोलकर यांनी दोन दुकानांपैकी दुकान क्रमांक २४ हे दत्ताराम कृष्णा बिचोलकर व दुकान क्रमांक २५ हे विराज कृष्णा बिचोलकर यांच्या नावावर हस्तांतरित केले होते. मात्र या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ही दोन्ही दुकाने एकच असल्याचे भासवून नगराध्यक्षांचा पती असलेल्या दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा डाव रचला गेला.
- हा बेकायदा प्रकार भिवशेट यांनी पालिका मंडळाच्या निदर्शनास आणला असता, उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर यांनी ही बैठक तहकूब केली.

हेही वाचा