एफडीएची दक्षिण गोव्यात कारवाई : निकृष्ट दर्जाचे साहित्य विकल्याचाही ठपका
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : निकृष्ट दर्जाचे गूळ, तीळ तेल, किरकोळ मका शेव, कोको पावडर आणि काजू बिया, दालचिनी बनावट ब्रँड वापरून खाद्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दक्षिण गोव्यातील २५ आस्थापनांवर कारवाई केली होती. या प्रकरणी तत्कालीन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा निर्णायक अधिकाऱ्याने आश्विन चंद्रू यांनी संबंधितांना ४.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे तसेच बनावट ब्रॅड वापरून खाद्य पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संचालक स्वेता देसाई याच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार, निकृष्ट दर्जाचे गूळ विक्री केल्या प्रकरणी नावेली, बाणावली, मालभाट व इतर ठिकाण्याच्या दुकानावर कारवाई केली होती. या प्रकरणी एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी स्नेहा नाईक, अभिषेक नाईक आणि बुधो गुरव यांनी कारवाई केली होती.
या प्रकरणी निर्णायक अधिकाऱ्याने १ लाख १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. निकृष्ट दर्जाचे तीळ तेल विक्री केल्या प्रकरणी एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया कोमरपंत यांनी कुडचडे येथील कंपनीवर कारवाई केली.
या प्रकरणी निर्णायक अधिकाऱ्याने २५ हजार रुपयांची दंड ठोठावला. निकृष्ट दर्जाचे कोको पावडर विक्री केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रुती पिळर्णकर यांनी फोंडा येथील दुकानावर तसेच मुंबई येथील कंपनीवर कारवाई केली. या प्रकरणी निर्णायक अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
काजू बियांच्या बनावट ब्रँड वापरून विक्री केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अंकिता पालयेकर यांनी वास्को येथील दोन दुकानावर कारवाई केली. या प्रकरणी निर्णायक अधिकाऱ्याने २ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
एफडीए 'अलर्ट' मोडवर-
निकृष्ट दर्जाचे किरकोळ मका शेव विक्री केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमरदिप गावडे प्रियोळकर यांनी धारबांदोडा येथील दुकानावर कारवाई केली. या प्रकरणी निर्णायक अधिकाऱ्याने २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दालचिनीची बनावट ब्रँड वापरून विक्री केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी झेनिओ रुझारियो यांनी वार्का येथील तीन दुकानावर कारवाई केली. या प्रकरणी निर्णायक अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.