पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यात १६ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये १० जागा या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आहेत. तर दोन जागा ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशनच्या आहेत. या दोन वगळता अन्य जागांसाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ नोव्हेंबर आहे.
पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सर्व १० जागा आरक्षित आहेत. या पदांसाठी वेतन श्रेणी ७ नुसार मासिक वेतन देण्यात येईल. यासाठी उमेदवाराकडे पशुवैद्यकीय कायद्यानुसार आवश्यक पात्रता असणे आणि गोवा पशुवैद्यकीय परिषदेत नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांच्या तीन जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवराकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
कामगार खात्याअंतर्गत येणाऱ्या ईएसआय इस्पितळात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन या जागेसाठी भरती केली जाणार आहे. तसेच कारखाने आणि बॉयलर विभागात प्रकल्प अधिकाऱ्याची जागेवर भरती केली जाईल. आरोग्य खात्यात कनिष्ठ रेडिओलॉजीस्टची भरती होणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यामध्ये उपसंचालक व संग्रहालय विभागात क्युरेटर या ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशन पद्धतीने भरण्यात येतील.
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल योग्य पद्धतीने लिहिण्याचे आवाहन आयोगाने केली आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून आयोगातर्फे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. आरोग्य खात्यातील वरिष्ठ पदांसाठी आवश्यक असल्यास कोकणी भाषा येण्याची अट सरकारच्या शिफारशीनंतर शिथिल करण्यात येईल.