गोवा : स्वच्छ ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना देणार पाठिंबा : मुख्यमंत्री

अमेझींग गोवा समिटचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
08th November 2024, 02:51 pm
गोवा : स्वच्छ ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना देणार पाठिंबा :  मुख्यमंत्री

पणजी : गोवा सरकार स्वच्छ ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना पाठिंबा देणार आहे. याद्वारे गोव्याला हरित राज्य करण्याचा आमचा हेतू असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. शुक्रवारी पणजीत अमेझींग गोवा समिटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री मॉविन गुदीन्हो, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, माजी मंत्री सुरेश प्रभू, विनय वर्मा, राजकुमार कामत, श्रीनिवास धेंपो यांच्यासह ५१ देशातील २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

 गोवा केवळ पर्यटन व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नाही. येथील नयनरम्य निसर्ग, तयार केलेल्या मूलभूत सोयी सुविधा, महामार्ग, दोन विमानतळ, रेल्वे ,बंदर आदींमुळे येथे उद्योग करणे सोयीस्कर आहे. यामुळेच गेल्या काही वर्षात येथे अन्न प्रक्रिया व अन्य हरित उद्योग वाढत आहेत. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. तसेच गोवा वेडिंग डेस्टिनेशन बनत आहे. येथे परिषद,बैठक,अधिवेशने घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

आम्ही सध्या एआय ,ब्लॉक चेन ,डेटा सिक्युरिटी, मत्स्य शेती, सायबर सुरक्षा अशा पर्यावरण पूरक उद्योगांना चालना देत आहोत. उद्योजकांनी गोव्यात येऊन अशा उद्योगात गुंतवणूक करावी. आम्हाला गोव्याला देशाचा आर्थिक केंद्र बिंदू बनवायचे आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ तयार करण्यासाठी आम्ही स्किकिंग, अप स्कीलिंग आणि रिस्किकिंग सुरू केले आहे. यामुळे गोव्यातील युवा पिढीला नवीन आव्हाने पेलण्यासाठी तयार करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. 

अन्य ठिकाणांमध्ये आणि गोव्यात गुंतवणूक करण्यात फरक आहे. गोव्यात तुम्ही व्यापारही करू शकता आणि आनंदी ही राहू शकता. येथील निसर्ग आम्हाला जपायचा असल्याने आम्ही केवळ पर्यावरण पूरक उद्योगांना पाठिंबा देणार आहोत. गोव्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी उद्योग खात्यातर्फे वेगवेगळी धोरणे आणली जात आहेत. आम्हाला गोव्याला देशाचे ट्रेडिंग हब बनवायचे आहे असे मंत्री मॉविन गुदीन्हो म्हणाले 

गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली आणणार : पीयुष गोयल

केंद्रीय उद्योग राज्य मंत्री पीयुष गोयल यांनी यावेळी आभासी पद्धतीने संवाद साधला. आम्ही गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली आणण्याचा विचार करत आहोत. हे एक प्रकारचे डेटा सेंटर स्टोरेज असणार आहे. गोव्यातील पर्यावरण पूरक उद्योगांना केंद्र सरकार पाठिंबा देणार आहे, असे ते म्हणाले

हेही वाचा