नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांविरूध्द अपात्र निलंबनाची तक्रार
म्हापसा : येथील नगरपालिकेने सरकारची विनामान्यता सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियाला आक्षेप घेत ही नेमणूक रद्द करण्याची सूचना पालिका मंडळाने नगराध्यक्षांना केली होती.
मात्र ही नियुक्ती रद्द न करता कर्मचाऱ्यांना मासिक वेतन दिले आहे. त्यामुळे पालिका मंडळाच्या बैठकीत पुन्हा नगराध्यक्षांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कर्मचारी भरती विरुद्ध एका नागरिकाने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी विरुद्ध अपात्र आणि निलंबनाची तक्रार पालिका संचालनालयाकडे दाखल केली आहे.
दि. ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत १८ जुलै रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत मंजूरीचा प्रस्ताव नगराध्यक्षांनी ठेवला. यामध्ये दोन जुनियर स्टेनो व चार एलडीसी अशी सहा कंत्राटी पदे भरण्याचा ठरावाचे इतिवृत्त मंजुरीसाठी आले.
मात्र इतिवृत्त मंजुरी व पालिका संचालनालयाच्या मान्यतेविना ही कर्मचारी भरती पालिकेकडून करण्यात आली. हा प्रकार बेकायदा असून ही भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षांकडे नगरसेवकांनी केली.
मात्र, हा विषय निर्णयासाठी बैठकीच्या इतर विषयांमध्ये घेऊ, अशी हमी नगराध्यक्षांनी बैठकीत दिली होती. परंतु इतिवृत्त मंजुरी पूर्वीच बैठक तहकूब करावी लागली होती. ही आता बैठक शुक्रवारी ८ रोजी होणार आहे.
या नोकर भरतीला पालिका मंडळातील सर्वच नगरसेवकांनी हरकत घेत ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा विषय इतर विषय पत्रिकेत घेऊ, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. तसेच या नोकर भरतीला पालिका मंडळाचा ठाम विरोध केला होता.
तरी देखील अक्षय मांद्रेकर, दिपय चिंचोणीकर, सत्यजित नाईक, अर्पिता कोरगावकर, तन्वी पै व मदीना या सहाही कंत्राटी कामगारांना ऑक्टोबर महिन्याचा पगार पालिकेने वितरित केला आहे. यावरून पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षा मनमानी कारभार चालवत असल्याचा दाव नगरसेवकांनी केला आहे. या वेतनावरूनही नगराध्यक्षांना घेरण्याचा निर्धार नगरसेवकांनी केला आहे.
पदाचा गैरवापर
या नोकर भरतीद्वारे नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी आपला नातेवाईक सत्यजित नाईक यास नोकरी मिळवून देऊन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत आत्माराम गडेकर यांनी पालिका संचालनालयाकडे तक्रार दिली आहे. यामुळे नगराध्यक्षा डॉ. बिचोलकर यांना अपात्र तर मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.