उत्तर गोव्यातील तलाठ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पणजी : बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी शासनाच्या आदेशाचे पालन करून तलाठी कोणत्याही सुरक्षा व पोलीस संरक्षणाशिवाय घटनास्थळी पाहणीसाठी जात आहेत. अशावेळी तलाठ्यांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुरक्षेची मागणी करणारे निवेदन उत्तर गोव्यातील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांना दिले आहे.
मेणकुरे पंचायतीचे तलाठी फटगो पालकर हे पाहणी करून परतल्यानंतर त्यांच्या कार्यालयात दोघांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा संपूर्ण उत्तर गोवा तलाठ्यांनी निषेध केला असून तलाठ्यांच्या सुरक्षेबाबत सखोल चर्चा करण्यासाठी त्यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांची भेट घेतली आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितले की, शासनाने अलीकडेच बेकायदेशीर बांधकाम, जमिनीचे रूपांतरण, वृक्षतोड, वाळू उत्खनन, चिरेखणी आणि नोटीस चुकवणे याविरुद्ध कडक नियम लागू केले आहेत.
कारवाईसाठी तलाठ्यांना गावोगावी आणि निर्जन भागात जावे लागते, कधी कधी रात्रीच्या वेळीही जावे लागते. मात्र त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना पोलीस संरक्षण नसते. त्यामुळे तलाठ्यांना घटनास्थळी मारहाण झाल्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे, विशेषत: महिला तलाठी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे प्रकर होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वाळू उत्खनन व चिरे उत्खनन स्थळांच्या पंचनाम्यावेळी तलाठ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांची सुरक्षा आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीनंतर बोलताना तलाठी पालकर म्हणाले की, आपल्या कार्यालयात मारहाणीची घटना घडून चार दिवस उलटले. याबाबत एफआयआर नोंदवण्यात आला, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी आम्ही आमच्या महसूल विभागाचे प्रमुख, जिल्हाधिकारी गिते यांची भेट घेऊन आलो. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे मेणकुऱ्याचे पीडित तलाठी फाटगो पालकर यांनी सांगितले.
मारहाण प्रकरणी पालकर म्हणाले की, त्यांनी शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी मेणकुरे पंचायतीचा ताबा घेतला होता आणि सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाची प्रत त्यांना सादर करण्यात आली.
या याचिकेच्या अनुषंगाने कारवाई करत असताना याचिकाकर्त्याचा मुलगा आणि मी जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलो होतो.
१०-१५ मिनिटांत आमचे सर्वेक्षण पूर्ण झाले आणि मी माझ्या ऑफिसमध्ये आलो. मी कार्यालयात असताना दोन जण आले आणि त्यांनी माझ्याशी वाद घातला आणि मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अचानक, त्याने माझ्यावर हल्ला केला आणि मला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ तयार केला.
घटनेनंतर मी मामलेदार आणि पोलीस निरीक्षकांना कळवले. पोलीस येईपर्यंत मी घटनास्थळी थांबलो आणि नंतर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. संशयित संजय नाईक आणि अशोक नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे पालकर यांनी सांगितले.
ठोस आश्वासन नाही !
जिल्हाधिकाऱ्यांशी आमची चांगली चर्चा झाली असून आमचे म्हणणे एेकून निर्णय कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ठोस आश्वासन मिळालेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या आमचे विभागप्रमुख जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट पाहत असून निर्णयानंतरच पुढील पावले उचलू, असे पालकर म्हणाले.