गोवा : कोकणी भाषा टिकली, तरच कोकणी समाज टिकेल!

अवधूत तिंबलो : मंगळुरू येथील कोकणी कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
08th November 2024, 12:22 am
गोवा : कोकणी भाषा टिकली, तरच कोकणी समाज टिकेल!


कोकणी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सत्कारमूर्तींसह उद्योजक अवधूत तिंबलो व इतर मान्यवर.

मंगळुरू : कोकणी भाषा ही आपली ओळख आणि स्वाभिमान आहे. आपली मातृभाषा टिकली, तरच आपला समाज टिकेल. अन्यथा तो दुसऱ्या समाजात विलीन होईल. आजचे युग डिजिटल आहे. त्यामुळे त्या माध्यमांचा वापर करायला हवा. आज कोकणी आभासी विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन फोमेंतो उद्योग समूहाचे अध्यक्ष अवधूत तिंबलो यांनी केले.

मंगळुरू येथील जागतिक कोकणी केंद्रात कोकणी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बुद्धिमत्तेपेक्षा संयम महत्त्वाचा आहे. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता ही ज्ञानापेक्षा अधिक शक्तिशाली आहे, असे तिंबलो पुढे म्हणाले.

यावेळी टी. विमला पै जीवन सिद्धी सन्मान फा. मोईझिन आताईद यांना, विमला पै कोकणी कृती पुरस्कार कवी प्रकाश द. नायक यांना, बस्ती वामन शणै विश्व कोकणी सेवा पुरस्कार (संस्था) सेवा भारती मंगळुरू या संस्थेला, बस्ती वामन शणै विश्व कोकणी सेवा पुरस्कार (महिला) विणा अडिगे-मुंबई यांना तिंबलो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हे सर्व पुरस्कार जागतिक कोकणी केंद्राने प्रायोजित केले होते.

कोकणी भाषा चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल जागतिक कोकणी केंद्रातर्फे अवधूत तिंबलो यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी मेघा पै यांनी कोकणी अभिमान गीत गायले. केंद्राचे अध्यक्ष नंदगोपाल शणै यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विश्व कोकणी केंद्राचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. दयानंद पै आणि टी. व्ही. मोहनदास पै यांचा संदेश कार्यक्रमात दाखवण्यात आला. कर्नाटक राज्योत्सवाचे जिल्हा पुरस्कार विजेते विल्यम डिसोझा यांना यावेळी गौरविण्यात आले.

कोकणी भाषा लेखन स्पर्धेत यश मिळविलेल्या नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळुरू येथील गगन भट्ट आणि गोव्याच्या अक्षय प्रकाश नायक यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जागतिक कोकणी केंद्राचे सचिव डॉ. कस्तुरी मोहन पै यांनी गोव्यातून कर्नाटक आणि केरळमध्ये स्थलांतरित झालेल्या गोवावासीयांनी कोकणी भाषा कशी राखली आणि विकसित केली हे स्पष्ट केले.

गिल्बर्ट डिसोझा, कुडपी जगदीश शणै, डॉ. किरण बुडकुले, बी. आर. भट्ट, रमेश नायक, मेल्विन रॉड्रिग्ज, शकुंतला किणी, वतिका पै, विल्यम डिसोझा, नारायण नायक यावेळी उपस्थित होते.

सूत्रसंचालन स्मिता शणै व सुचित्रा शणै यांनी केले. या कार्यक्रमाला केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा