पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गुरुवार, दि. ७ रोजी थोरलेभाट, केरी - पेडणे येथील चर्चजवळ असलेल्या एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून रशियन महिलेला अटक केली. तिच्याकडून १६.८८ लाख रुपये किमतीचे ३३७ ग्रॅम हाइड्रोक्सी ब्यूटाइरेट (लिक्विड एॅक्टसी) आणि ३६ ग्रॅम गांजा जप्त केला.
थोरलेभाट, केरी - पेडणे येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विदेशी महिलेने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठवल्याची माहिती एएनसीला मिळाली होती. त्यानुसार, अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील फालकर, हवालदार सॅड्रिक फर्नांडिस, कॉन्स्टेबल सचिन तोरस्कर, विशाल शितोळे, महिला काॅ. ज्योती नाईक, दीपा बांदेकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी उत्तररात्री १२.४० ते सकाळी ८ दरम्यान संबंधित खोलीवर छापा टाकला. पथकाने खोलीत राहणाऱ्या रशियन महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. तसेच खोलीची झडती घेतली. पथकाने तिच्याकडून १६.८८ लाख रुपये किमतीचे ३३७ ग्रॅम हाइड्रोक्सी ब्यूटाइरेट (लिक्विड एॅक्टसी) आणि ३६ ग्रॅम गांजा जप्त केला. गोव्यात वरील प्रकारचे ड्रग्ज पहिल्यांदा सापडल्यामुळे एएनसीसमोर आव्हान उभे राहिले आहे.
या प्रकरणी एएनसीने संशयित महिलेविरोधात २०(बी) (ii) (ए) आणि २२(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.