कोलवाळ पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
म्हापसा : एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे भासवून एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला ३.१८ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना दि. ३० ऑक्टोबर रोजी घडली. तर, जोजफ डिसोझा (रा. शिरसई व मूळ मुंबई) यांनी बुधवार, दि. ६ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादीला तुमचे बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे, असा अज्ञात क्रमांकावरून एक मॅसेज आला. हा संदेश बँकेकडून त्यांच्या पेन्शन संबंधित असेल, असे गृहीत धरून फिर्यादींनी कार्ड अनलॉक करण्यासाठी तिथे दिलेल्या मोबाईलवर कॉल केला. तेव्हा संशयिताला आधार कार्डचा तपशील त्यांनी दिला. नंतर ओटीपी शेअर केला. ओटीपी मिळाल्यावर संशयितांनी त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग व पेन्शन खात्यातून एकूण ३ लाख १८ हजार १७३ रूपये रक्कम हस्तांतरित केली.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादींनी कोलवाळ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा. न्या. सं.च्या ३१८, ३१९ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६-ड अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत खरत करीत आहेत.