कर्नाटक : खानापूर-सिद्धापूर तालुक्यांत हत्तीचा धुडगूस; हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी

वनखात्याने नुकसानीची नोंद घेत भरपाई द्यावी तसेच हत्तींचाही बंदोबस्त करावा अशी स्थानिकांची मागणी.

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th November, 12:29 pm
कर्नाटक : खानापूर-सिद्धापूर तालुक्यांत हत्तीचा धुडगूस; हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी

जोयडा : गोव्याच्या शेजारीच असलेल्या पश्चिम घाटात वसलेल्या खानापूर तसेच सिद्धापूर तालुक्यांत यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने येथील शेतात पीक देखील चांगल्याप्रकारे आले आहे. मात्र सध्या येथे एका हत्तीने बस्तान मांडले असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या चार दिवसांत या भागात हत्तीने हातातोंडाशी आलेल्या भात व ऊसाच्या पिकांवर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. हा हत्ती रात्रंदिवस शेतात ठाण मांडून असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे देखील दुरापास्त बनले आहे.  दरम्यान वनखात्याने आतापर्यंत झालेल्या नुकसानीची नोंद घेत भरपाई द्यावी तसेच भागात असलेल्या इतर हत्तींचाही बंदोबस्त करावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.   

 

दरम्यान कारवार जिल्ह्यातील सिद्धापूर तालुक्याच्या शेलूरी येथे एक हत्ती सुपारीच्या बागायतीत तसेच भाताच्या पिकात शिरून नुकसान करत असल्याने शेतकरी पूर्तेच हवालदिल झाले आहेत.  तर खानापूर तालुक्यातील जळगे परिसरात गेल्या चार दिवसापासून हत्ती शेतकऱ्यांच्या शिवारात शिरून भातावर ताव मारत आहेत. सुगीच्या कामांसाठी शेतकरी शेतात जाण्यास देखील आता मागे पुढे होत आहेत. दरम्यान या हत्तीने जळगे येथील मुरलीधर पाटील व प्रमोद पाटील यांच्या मळणीसाठी तयार असलेल्या भाताच्या गंजी फस्त केल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत त्यांनी मळणीचे नियोजन केले होते. तत्पूर्वीच मंगळवारी हत्तीने भातगंजी विस्कटून सगळे पीक मातीमोल केले .




सध्या करंबळ, जळगे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे या हत्तीकडून अतोनात नुकसान सुरू आहे. हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जोर लावून धरलेली असताना वनविभागाचे अधिकारी केवळ हत्तीचा माग काढणे आणि नुकसानीचा पंचनामा करणे यातच व्यस्त आहेत.



हेही वाचा