‘दो पत्ती’आड मिळालेला संदेश

बायकांना हे मानसिक किंवा शारीरिक हिंसाचाराचे प्रसंग अनुभवास येताना याविरुद्ध काही बोलायचे याची बरेचदा हिम्मत नसते कारण आपला संसार, मुलं, माहेर यांना आपल्यामुळे त्रास नको या भावनेतूनच गप्प राहणे, सहन करणे याला अधिक मिळालेले बळ. अधूनमधून असे चित्रपट येतात ज्यामुळे अश्या कृत्यांविरुद्ध आवाज उठवला जातो.

Story: तिच्या लेखणीतून |
02nd November 2024, 11:17 am
‘दो पत्ती’आड मिळालेला संदेश

क्रिती सेननचा डबल रोल आणि काजोलची झलक पाहून बघितलेला हा चित्रपट काजोलच्या ओढून ताणून केलेल्या पोलीस ऑफिसरमुळे म्हणा किंवा अनाकलनीय अतर्क्य प्रसंगांमुळे म्हटलं तर काहीसा फुसका ठरलेला, पण विचार मात्र करायला लावणारा. बायकांवर होणारे घरगुती हिंसाचार आणि त्याविरुद्ध उठवलेला आवाज हा एकूण या चित्रपटाचा विषय, पण एका वेगळ्याच ट्विस्टने वेगळे वळण घेतलेला हा चित्रपट आठवणीत मात्र राहील एवढे नक्की. सौम्या आणि शॅली अश्या दोन जुळ्या बहिणींची ही गोष्ट हळूहळू पुढे सरकत जाते ती यांच्या आताच्या आयुष्याशी धागे जोडल्या गेलेल्या यांच्या बालपणातून. विद्या ज्योती म्हणजे आपली काजोल, जी एक पोलीस अधिकारी असते, तिला घरगुती हिंसाचाराबाबत कळवणारा एक फोन येतो आणि ती बातमी खोटी आहे असे चौकशी दरम्यान दाखवले जाते. पण एवढ्यात या जुळ्या बहिणींची दाई आपण हा कॉल केल्याचे सांगते आणि ती सुरुवातीपासूनची स्टोरी विद्या ज्योतीला सांगते. यात या जुळ्या बहिणींचे बालपण, मग लग्न, लग्नानंतरच्या घटनांचे कथन ती करते. आईच्या मृत्यूपासून असंख्य फोबिया आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे काळजीचे केंद्रबिंदू बनलेल्या सौम्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे आता शॅलीचा संताप वाढत जाऊन जुळ्या बहिणी असूनही एकमेकींच्या या वैरिणी झालेल्या असतात. विद्या ज्योतीला बहिणींचे वैर आणि ध्रुवच्या सौम्याबाद्दलच्या हिंसक वर्तनाबद्दल कळते. दाई म्हणजेच माँजी सांगतात की, सौम्या जेव्हा जेव्हा मूल होण्याबाबत ध्रुवशी बोलते तेव्हा ध्रुवचा राग भडकतो आणि त्यामुळे अनेकदा शारीरिक शोषण होते. एका घटनेत तो तिला पायऱ्यांवरून खाली ढकलतो आणि तिला बेशुद्ध करतो. ध्रुवला न्याय मिळवून देण्याचा निर्धार करून विद्या ज्योती याविरुद्ध आवाज उठवते. परंतु ध्रुव ठामपणे सांगतो की तिचे पडणे अपघाती होते, सौम्याही पोलिसांसमोर त्याचे समर्थन करते आणि नंतर त्याच्यासोबत नव्याने संसाराची सुरुवात करण्याचा विचार त्याला बोलून दाखवते, ज्याला तोही होकार देतो. परंतु अचानक असे काही होते की सौम्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाच्या आधारे ध्रुवला अटक करण्यात येते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुराव्यासह, त्याचा हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचारासाठी दोषी ठरवण्यात येऊन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते...आणि इथे येतो तो यातला मोठा ट्विस्ट! आपल्या विद्या ज्योतीला एका छोट्याश्या कारणामुळे या संपूर्ण केसच्या तपशीलात विसंगती जाणवू लागते आणि शोध सुरु होतो तो सत्याचा. जे काही वेगळेच असते... 

ते काय असते हे कळायला चित्रपट स्वतः पाहणे खरे तर उत्तम. त्यामुळे अधिक खोलात जात नाही. पण खरे सांगायचे तर घरगुती हिंसाचार मग तो मानसिक असो किंवा शारीरिक, तो सहन करणे, तो इतरांवर होताना आपण गप्प बसून राहणे हा कायद्याने आणि नैतिकदृष्ट्याही गुन्हा आहे हे पूर्ण चित्रपटभर अधोरेखित होत राहते आणि त्यामुळेच असे चित्रपट खरोखर आजच्या काळाची गरज आहेत असे वाटत राहते. आज मिडियामुळे फ्रीजमध्ये, कुकरमध्ये सापडणाऱ्या शोषितांच्या अन्यायावर वाचा फोडली जातेय पण कितीतरी वर्षांपासून छोट्यामोठ्या प्रमाणात हा घरगुती हिंसाचार कितीतरी बायका सहन करत मुकाट्याने आपला संसाराचा गाडा हाकत आलेल्या दिसतात. आपल्या आजूबाजूलाच, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये अश्या कितीतरी घटना आपल्या डोळ्यांदेखत साक्षात उभ्या असतात. पण अश्या बायकांना कधीकधी समजावणेही कठीण असते की हे चुकीचे करताय, हे सहन करणे म्हणजे गुन्हा आहे. अश्या कितीतरी मनकळ्या खुडल्या, चिरडल्या, कुस्करल्या जात असतायत. पण दखल कोण घेतो? म्हणून सगळे अलबेल चालूच असते. 

गावात असो वा मोठ्या शहरात, गरीब असो किंवा मोठ्या श्रीमंत कुटुंबात घरच्या बायकांना हे मानसिक किंवा शारीरिक हिंसाचाराचे प्रसंग अनुभवास येताना याविरुद्ध काही बोलायचे याचे भान नसते किंवा हिम्मत नसते कारण पूर्वापार चालत आलेली विचारांची बेडी किंवा आपला संसार, मुलं, माहेर यांना आपल्यामुळे त्रास नको, यांच्यावर आपल्यामुळे ओरखडा नको या भावनेतूनच गप्प राहणे, सहन करणे याला अधिक मिळालेले बळ. अधूनमधून असे चित्रपट येतात ज्यामुळे अश्या कृत्यांविरुद्ध आवाज उठवला जातो, एखाद दुसरी घटना समोर येते, त्याविरुद्ध बोललं जातं. पण तरीही कितीतरी श्रद्धा वालकर, पश्चिम बंगाल केस, बंगलोर केस अजूनही गुलदस्त्यात असतील सांगता येत नाही. सुशिक्षित, सबळ, स्वतंत्र विचारांच्या स्त्रियासुद्धा सन्मान मिळत नसलेल्या आणि अत्याचार सहन कराव्या लागणाऱ्या नात्यांमध्ये अडकून राहतात. सर्वकाही ठीक होईल या निष्फळ विश्वासाने, आपल्याला मिळालेल्या विचारांमुळे आपल्या भावनांना, आपल्या नात्याला झालेल्या पहिल्या तड्यापासून अखेरच्या तुकड्यापर्यंत गप्प राहण्याचे बळ अंगी ठेवणारी बाई ही किती सहनशील असेल, किती डेअरिंगबाज असेल याची परिणती स्वतःची स्वतःलाच झाल्याशिवाय अश्या स्त्रियांमध्ये बदल घडून आणणे शक्य नाही. त्यामुळे अश्या चित्रपट निर्मितीकडे ग्लॅमरपलीकडे त्यांच्यातल्या विचारांच्या, त्यातून काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने स्त्रियांनी पाहणे खरी काळाची गरज आहे असे वाटते.


स्नेहा सुतार