दिवाळीत द्या आरोग्याला प्राधान्य!!

काही आरोग्यविषयक खबरदारींचे पालन करून, आपण सणासुदीच्या काळातही आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊ शकतो. तसेच सणांदरम्यान निरोगी आरोग्याचे संतुलन राखून दिवाळीचा आनंद घेऊ शकतो.

Story: आरोग्य |
02nd November 2024, 11:15 am
दिवाळीत द्या आरोग्याला प्राधान्य!!

दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय. आपल्या सगळ्यांनाच जीवनात वेळोवेळी संघर्षाचा अनुभव येत असतो. नेहमीच योग्य आणि अयोग्य, निरोगी आणि अस्वस्थ, तर्कशुद्ध आणि तर्कहीन, प्रकाश आणि अंधार यांचा अंतर्गत संघर्ष आयुष्यात चालूच असतो. या अंतर्गत लढ्याचा आपल्या आजूबाजूच्या जगावर आणि आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत असतो. अशा वेळी सणासुदीच्या काळात काही सोप्या गोष्टींतून आपले शारीरिक अन् मानसिक आरोग्य कसे राखावे हे आपण जाणून घेऊयात. 


दिवाळीच्या दिवसांत शारीरिक आरोग्य राखण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.

संतुलित आहार : दिवाळी फराळाचा आनंद घेताना, आपल्याला आवश्यक पोषक घटक मिळत असल्याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी जेवणात फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करून आहार संतुलित राखण्याचा प्रयत्न करावा. वेळ न जुमानता नुसता फराळ खात राहणे टाळावे. दिवाळीच्या मिठाईमध्ये जास्त साखर असू शकते, त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी असलेल्या मिठाईची निवड करावी किंवा आरोग्यदायी मिष्टान्नांचा पर्याय शोधावा.

हायड्रेशन : भरपूर पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेटेड ठेवावे. खासकरून साखरयुक्त किंवा खारट पदार्थ आपण जास्त खात असल्यास ही काळजी घेणे गरजेचे आहे. साफसफाई वेळी, कामाचा ताण असतानाही पुरेसे द्रवपदार्थ व पाणी आहारात असल्याने पचनास मदत होते आणि डिहायड्रेशन टाळले जाते.

नियंत्रण : दिवाळीतील मिठाई आणि स्नॅक्समध्ये अनेकदा साखर आणि कॅलरीज भरभरून असतात. अपचन तसेच वजन वाढू नये म्हणून त्यांचे सेवन माफक प्रमाणात करावे. पोर्शन कंट्रोल नियंत्रित करण्यासाठी आणि जास्त खाणे टाळण्यासाठी लहान ताटांचा वापर करावा. प्रत्येक घासाचा आस्वाद आणि स्वादांचा आनंद घेण्यासाठी व नीट पचन व्हावे यासाठी हळूहळू खावे व माईंडफूल इटींगचा सराव करावा.

शारीरिक हालचाल : सणाचा आनंद घेताना आपले शारीरिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. योग, व्यायाम, नृत्य किंवा इतर कोणत्याही प्रकारची हालचाल यासारख्या नियमित शारीरिक क्रियांमध्ये गुंतणे ही चांगली सवय आहे. यामुळे शारीरिक आरोग्यासोबत शरीरातील एंडॉर्फिन बाहेर पडतात आणि आपला मूड सतेज राहतो.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी,

सीमा निश्चित करणे : आपल्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, आपल्या सभोवतालच्या लोकांशी सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आपल्याला दिवाळी दरम्यान ओव्हरटाईम किंवा सुट्टीच्या दिवशी काम करण्यास सांगितले जाऊ शकते. पुरेसा ब्रेक न घेता सातत्याने काम केल्याने दमल्यासारखे वाटू शकते. त्याऐवजी, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी सीमा निश्चित करू शकतो आणि हे स्पष्ट करू शकतो की, आपल्याकडे सुट्टी असल्याने आपण उत्सवादरम्यान काम करणार नाही. यासोबत वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला तणावपूर्ण आणि चिंताग्रस्त वाटू शकणाऱ्या गोष्टींपासून आपण सीमा ठरवून वागू शकतो. उत्सवादरम्यान मित्र-परिवारात आपण ज्या लोकांना भेटतो, संवाद साधतो त्यांच्या संदर्भात देखील आपण सीमा देखील सेट करू शकतो.

योजनेनुसार काम करणे : दिवाळी दरम्यान घराची साफसफाई, रंगकाम, मिठाई आणि इतर पदार्थ बनवणे, घर सजवणे, भेटवस्तू खरेदी करणे, पूजेची तयारी करणे, अशी अनेक छोटी-मोठी कामे असतात व ही सांभाळणे तणावदायक ठरू शकते. अशा परिस्थितींमध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसह योजना बनवणे, त्या तडीस नेणे, जबाबदाऱ्या सोपवणे, प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करणे आणि आपल्या चेकलिस्टनुसार काम करणे आवश्यक आहे. असे केल्याने तणाव कमी राहण्यास आणि चांगले मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते.

स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे : आपण मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी, आपल्याला आवश्यक असलेल्या आणि इच्छित असलेल्या सर्व गोष्टी करण्यासाठी व आपले काम करता करता इतरांची मदत करण्यासाठी आधी वेळ काढून स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. आपली ऊर्जा आणि प्रेरणा पातळी पुन्हा भरून काढण्यात मदत करणारी कार्ये करावीत. खास करून सणादरम्यान आपण स्वत:ची काळजी घेतल्याने आव्हानांचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास आणि सणासुदीच्या काळात अधिक आनंदित राहण्यास मदत होते.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर