द्रौपदीसी बंधु शोभे…

Story: मनातलं |
02nd November, 11:12 am
द्रौपदीसी बंधु शोभे…

दिवाळी सण नात्यांना बांधून ठेवणारा, नातं वृद्धिंगत करणारा. त्यातला भाऊबीज हा दिवस खास बहीण भावासाठी राखून ठेवलेला महत्त्वपूर्ण दिवस. ज्या दिवसाची प्रत्येक बहीण आतुरतेने वाट पहात असते. एरव्ही तिला भावाची किंवा भावाला तिची आठवण होत नाही असं नाही पण कधी कधी नाईलाज होतो. दूर असतात, कामात गुंतलेले असतात, संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आठवण झाली तरी भेटायला जमतच असं नाही. लहानपणापासून एकत्र असताना मनात जपलेलं भावाबहिणीचं नातं, ती माया, ती ओढ, कुणाला सांगितली नाही तरी जीवाला ओढ लावणारी असते. प्रत्येक बहिणीला आपला भाऊ तो श्रीमंत असो की गरीब, लाख मोलाचा वाटत असतो. तिच्या हृदयात त्याच्यासाठी एक खास जागा असते. त्याच्याविषयी माया प्रेम मनात दाटलेले असते. त्याने तिला काही देवो अगर न देवो त्यावर तिचे प्रेम अवलंबून नसते. फक्त त्याने अधीमधी आपली आपुलकीने चौकशी करावी, ख्याली खुशाली विचारावी आणि तिने मोकळेपणाने त्याच्याशी चार शब्द बोलावे एवढीच तिची अपेक्षा असते.  

आईवडिलानंतर भाऊ बहीण म्हणजेच तिचं माहेर असतं. ती नात्याची नाळ तिला तुटू न देता सतत बांधून ठेवायची असते. नात्यांमधली भावनिक ओढ भावाबहिणीला एकत्र बांधून ठेवत असते. तिथे लोभ, मोह, मत्सर यांना जागा नसते आणि नसावी. तसं जर झालं, तर नात्यांमध्ये दरार पडायला वेळ लागत नाही. समज गैरसमज त्याला खतपाणी घालतात. नात्यात व्यवहार आला किंवा प्रॉपर्टीचा प्रश्न आला की तिथेच नात्याला तडा जायला सुरुवात होते. कारण स्वार्थ कुणाला चुकलाय. आजकाल वडिलोपार्जित इस्टेटीसाठी भावा बहिणीचे नाते इतके टोकाच्या शत्रुत्वला पोहचलेले दिसते की ते एकमेकांच्या जिवावर उठताना 

दिसतात. 

भाऊबीज बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आदर राखणारा, सन्मान वाढवणारा दिवस. या दिवशी आवर्जून आठवण येते ती श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या नात्याची, भावा बहिणीच्या अतूट प्रेम बंधनाची आणि आठवण येते त्या गीताची...‘भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण’ यात भावा बहिणीच्या नात्याचे चित्रण केलेले दिसते. नरवर श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाच्या दोन बहिणी एक रक्ताच्या नात्याची सुभद्रा आणि एक मानलेली बहीण द्रौपदी. एकदा श्रीकृष्ण सुभद्रा आणि द्रौपदी राजमहालात फलाहार करत बसले होते. तिथे नारद मुनीही होते. फळं कापत असताना कृष्णाचे बोट कापले.  त्यातून भळभळा रक्त वाहू लागलं. वाहणाऱ्या रक्ताला थांबवायला चिंधी हवी असते. नारद सुभद्रेकडे मागतात. तिला आपल्या श्रीमंतीत खऱ्या प्रेमाचा विसर पडतो. शालू, शेले, पैठणी कशी फाडू, माझ्याकडे चिंधी नाही म्हणते. पण त्याचवेळी द्रौपदी मात्र क्षणाचाही विलंब न लावता अंगावरचा भरजरी शेला फाडून कृष्णाच्या जखमेवर चिंधी बांधते. रक्त वाहणे थांबवते. भावा बहिणीतले बंध असे दृढ होतात. मनात कसल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केलेले खरे प्रेम. ‘रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण, प्रीती जी करती जगी लाभविण’ प्रेमात कसलीही लाभाची अपेक्षा ठेवली गेली की त्याची किंमत शून्य होऊन जाते. 

अशी संदेश देणारी मधुर गीते आता तयार होत नाहीत. ज्या योगे मनात कुठेतरी प्रेमाची, मायेची महती पुन्हा नव्याने जागृत होईल. याच कथेवरचे ग. दी. माडगूळकरांचे चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला हेही गीत भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणारे. किती सुंदर असेल ना ते रेशीमबंधांनी जुळलेले त्यांचे अलौकिक पवित्र नाते! ‘साद घालता येईन धावून’ हे कृष्णाने दिलेले वचन द्रौपदीवर वस्त्रहरणाची वेळ आल्यावर पाळलेले आपण पहातो. तसेच प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला आश्वस्त केलं पाहिजे की घाबरू नको, मी तुझ्यापाठी सदैव उभा राहीन. तुझ्या मदतीसाठी तत्पर असेन. आणि बहीणही त्याला उत्तर देऊ शकेल. तुझ्यासारखा भाऊ जर माझा पाठीराखा असेल, तर माझ्यावर वाईट प्रसंग येईलच कसा. 

आपल्या भावाचे दु:ख न बघवून द्रौपदीने भारी वस्त्राची पर्वा न करता जे केले ते सुभद्रा सख्खी बहीण असून भरजरी वस्त्राच्या प्रेमात गुरफटून राहिली. आपल्या अंतर्मनापासून तिने तिचे कर्तव्य पार न पडल्याने, जबाबदारी न झेलल्यामुळे ती जणू झाली वैरिण. तर कृष्ण जिचा मानलेला भाऊ, सखा होता त्याच्यासाठी ती द्रौपदी काळजाची चिंधी काढून द्यायला सुद्धा तयार झाली. तिच्या श्रीकृष्णावरच्या या अथांग प्रेमामुळे तिला कृष्णा असेही संबोधले जायचे. या गीताचे तात्पर्य ‘प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण’ नाते भले रक्ताचे नसेल तरी देखील प्रेमाच्या विलक्षण शक्तीपोटी केवळ भावाचा भुकेला असलेला नारायण प्रसन्न होऊन अंतरीची खूण पटवतोच. तसंच निर्व्याज प्रेम भावा बहिणी मध्ये असेल तर एकमेकांची तुलना, मान-अपमान, ईर्ष्या, पैसाअडका अशा अडथळ्यांची पर्वा न करता जे टिकतं ते खरं प्रेम.

बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा हा उत्सव यालाच ‘यम द्वितीया’ असेही म्हणतात. यम आणि त्याची बहीण यमी हिने आपल्या भावाला या दिवशी घरी जेवायला बोलावले तेव्हा यमाने तिला वस्त्रालंकार दागदागिने भेट देऊन तिच्या घरी भोजन केले यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो, जिला भाऊ नसेल ती स्त्री चंद्राला भाऊ म्हणून ओवाळते. भावा बहिणीचे नाते अशा सणामुळे वाढीस लागते. दिवाळीच्या दिवशी भावाला अभ्यंग स्नान घातल्यावर फराळ देऊन जेवायला घालून त्याचे औक्षण केल्याने बहिणीच्या मनाला येते ती तृप्तता पुढच्या दिवाळीपर्यंत मनात तेवत राहते. चांदीचे ताट, चंदनाचा पाट, सुगंधित तेल, साबण आणि उटणे याचा सुगंध दरवळतोय, पाटाच्या भोवतीने रांगोळीचा थाट केला आहे, फराळाच्या पदार्था सोबतच गोडधोड पक्वान्न बनवून भावाला आग्रहाने जेवू घातले आणि उजळलेल्या पंचारतीच्या ज्योतींनी भावाला ओवाळले की बहिणीच्या भाऊबीज या दिवसाचे सार्थक होते. अशी ही वेड्या बहिणीची वेडी माया मिळायलाही भाग्य लागतं.     


प्रतिभा कारंजकर, फोंडा