बेकायदा नोकर भरतीवरून म्हापसा नगराध्यक्ष धारेवर

इतिवृत्त मंजुरीविना पालिका मंडळाची बैठक तहकूब करण्याची नामुष्की

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October, 10:26 pm
बेकायदा नोकर भरतीवरून म्हापसा नगराध्यक्ष धारेवर

म्हापसा : नगरपालिका संचालनालयाच्या मान्यतेविना बेकायदेशीररीत्या नोकरभरती करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने मागील बैठकीचे इतिवृत्त मंजुरीसाठी आणून पोरखेळ चालवल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यामुळे म्हापसा पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतिवृत्त मंजुरीविना नगराध्यक्षांना पालिका मंडळाची बैठक तहकूब करावी लागली.

नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. ३० रोजी पालिका मंडळाची सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर व इतर नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांच्या वाढत्या हरकतीमुळे सुमारे २ तास चाललेली ही बैठक नगराध्यक्षांनी तहकूब केली. आता ही बैठक शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. होणार आहे.

दि. १८ जुलै २०२४ रोजी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त मंजुरीसाठी नगराध्यक्ष डॉ. बिचोलकर यांनी ठेवले. मात्र, नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी कंत्राटी पद्धतीवर नोकरभरतीसाठी घेण्यात आलेल्या ठरावाच्या इतिवृत्तांत मंजुरीला आक्षेप घेतला. आपण या ठरावाला हरकत घेतली होती. तसेच या इतिवृत्तांत मंजुरीविना नोकर भरती कशी काय करण्यात आली, याचे स्पष्टीकरण त्यांनी मागितले. ठरावानुसार, दोन ज्युनियर स्टेनोग्राफर व चार कनिष्ठ कारकून अशी सहा पदे कंत्राटी पद्धतीने घेतली असून चालून आलेली प्रक्रिया अवलंबविल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

नार्वेकर यांच्यासह प्रकाश भिवशेट, आनंद भाईडकर, विराज फडके, तारक आरोलकर, सुधीर कांदोळकर, शुभांगी वायंगणकर, अन्वी कोरगावकर यांच्यासह इतर नगरसेवकांनी याला आक्षेप घेत नोकरभरती रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर हा विषय बैठकीच्या विषय पत्रिकेमध्ये निर्णयासाठी घेऊ असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.

बैठकीच्या विषयपत्रिकेवर ११ विषय होते. मात्र, गत बैठकीच्या इतिवृत्तांतावर नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने एकाही विषयावर चर्चा झाली नाही. अखेर ही बैठक तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्षांवर ओढवली.

तत्पूर्वी नगराध्यक्षांनी १८ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तांत मंजुरीसाठी आणले. या बैठकीत नगराध्यक्षांसह १८ नगरसेवक उपस्थित होते. मात्र, इतिवृत्त पत्रिकेवर चार अधिकाऱ्यांसह २२ सदस्य उपस्थित असल्याचे नमूद होते. शिवाय मागील तीन बैठकांचे मंजूर झालेले इतिवृत्त पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यास नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी आक्षेप घेतला. कारण मुख्याधिकारी वगळता इतर पालिका अधिकारी किंवा कर्मचारी पालिका मंडळाचे सदस्य नाहीत, हे भिवशेट यांनी निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, धुळेर मधील एका प्रकल्पाला हरकत घेतली असताना पालिकेने कोणत्या आधारावर त्याला भोगवटा प्रमाणपत्र आणि व्यापार परवाना दिले, असा प्रश्न नगरसेवक तारक आरोलकर यांनी नगराध्यक्षांना केला. मात्र, नगराध्यक्षांकडे समर्पक उत्तर नव्हते. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाचा व्यापार तसेच भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावा, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. याविषयी आपण पालिका संचालनालयाकडे तक्रार करणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.

बेकायदेशीररीत्या नोकर भरती : भिवशेट

नगरपालिका कायद्यानुसार पालिका मंडळाने घेतलेला एखादा ठराव हा पुढील बैठकीत इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर तो नगरपालिका संचालनालयाला पाठवावा लागतो. तिथून मान्यता मिळाल्यावरच पुढील कारवाई करावी लागते. मात्र, इथे या प्रक्रियेचा वापर न करता बेकायदेशीररीत्या ही नोकर भरती केली गेली, असा आरोप नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी केला. 

हेही वाचा