नागपूर : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येत्या २० नोव्हेंबरला होत आहेत. काल २९ ऑक्टोबर ही उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र वंचित बहुजन आघाडीत सामील झालेले काँग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद दोन मिनिटे उशिरा आल्याने उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत. त्यांना मध्य नागपुरातून उमेदवारी अर्ज भरायचा होता.
उमेदवारी अर्ज भरण्याआधी अनीस अहमद भव्य मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक कार्यालयात पोहचेपर्यंत दुपारी तीन वाजले. विलंब झाल्याने ते दोन मिनिटे उशिरा पोहोचले, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अनीस अहमद यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करून आपला उमेदवारी अर्ज स्वीकारावा, असे आवाहन केले होते. मात्र, रात्रीपर्यंत त्यांची विनंती मान्यच करण्यात आली नाही.
अनीस अहमद यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीला आत बसवले होते. त्याला आठ क्रमांकाचे कूपन देण्यात आले. ते नियोजित वेळेपूर्वीच कार्यालयात पोहोचले होते असाही दावा यावेळी अहमद यांनी केला. एकदा कार्यालयाच्या गेटच्या आत पोहोचल्यावर अर्ज अस्वीकार करण्याचे कारण काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पोलिसांनी त्यांना गेटवर तपासणीसाठी अडवले होते.
उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्यानंतर अहमद यांनी कार्यालयाच्या आवारात अनेक तास धरणे दिले. अनेक ठिकाणी रस्ता बंद केल्यामुळे आणि वाहनांच्या प्रवेशावर बंदी असल्यामुळे त्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अनीस अहमद यांनी गुडघ्याच्या दुखापतीचे कारण देत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची विनंती रिटर्निंग ऑफिसरला केली, मात्र ती फेटाळून लावण्यात आली.