एकापाठोपाठ उजेडात आलेल्या या प्रकरणांनी राज्यात खळबळ माजली. परंतु, या प्रकरणांत नेमके दोषी कोण? पैसे घेणारे भामटे की पैसे देऊन सरकारी नोकरी खरेदी करू इच्छिणारे नागरिक? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
सरकारी नोकरी मिळणार म्हटले की गोव्यातील तरुणाई आणि त्यांचे पालक कोणत्याही थराला जाऊ शकतात. मंत्री, आमदारांशी साटेलोटे असल्याचे पुरावे दाखवून एखाद्याने सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले की गोमंतकीय माणूस कर्ज काढून का असेना, पण समोरचा जितकी रक्कम मागतो तितकी त्याला देण्यास तयार होतात. त्यातील काही जणांची स्वप्ने साकार होतात. पण, बहुतांशी जण पैसे गमावून बसतात आणि नंतर समाजात अब्रू जाऊ नये म्हणून मूग गिळून गप्पही बसतात. याचा अनुभव गेल्या काही वर्षांत अनेक गोमंतकीयांनी घेतला असल्याचे पूजा नाईक हिच्या प्रकरणातून समोर आले आहे.
बारा वर्षांपूर्वी राज्यातील एका प्रादेशिक राजकीय पक्षाच्या कार्यालयात काम करणाऱ्या पूजा नाईक हिने राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींना गंडवण्यास सुरुवात केली. त्यातील काही जणांना विविध सरकारी खात्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्याचा दावा ती करते. त्यांची उदाहरणे देऊन तिने इतर अनेकांकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपये उकळल्याचे तिच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या आलिशान वाहने, फ्लॅट आणि सोन्यातून दिसून येते. पूजा नाईकचे हे कारनामे जसजसे उघड होऊ लागले, तसतशा तिच्याविरोधात विविध पोलीस स्थानकांत तक्रारी वाढू लागल्या आणि त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पूजा नाईकचे कारनामे चव्हाट्यावर आणले.
चार महिन्यांपूर्वी पूजा नाईक एका व्यक्तीला घेऊन आपल्याला भेटण्यासाठी आपल्या घरी आली होती. तिने आपल्याला खासगीत बोलायचे असल्याची विनंती केली. त्यावेळी आपण तिला जे विचारले ते ऐकून तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलताच ती नेमकी कशासाठी आली आहे, याचा अंदाज आपल्याला आला. त्यानंतर आपण तिच्याविरोधात डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यावेळी तिची चौकशी करून सुटका केली. पण, त्यानंतर तिला अशाच प्रकरणांत तीनवेळा अटक झाल्याचे सांगत, पूजाकडे पाच आलिशान वाहने तसेच चार ते पाच फ्लॅट आहेत. शिवाय तिने आठ ते दहा विदेश दौरे केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भामटी पूजा नाईक गेल्या बारा वर्षांपासून नागरिकांना सरकारी नोकऱ्यांच्या नावाने फसवत राहिली. तिच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी मागचा पुढचा विचार न करता तिला लाखो रुपये दिले. या प्रकरणांत तिला अटक झाली आणि आता तिची जामिनावर सुटकाही झालेली आहे. यापुढेही तिच्याविरोधात तक्रारी येतील, तिला पुन्हा अटक होईल, त्यातून तिची सुटकाही होईल. परंतु, तिने ज्यांना ज्यांना गंडवले आहे, त्यांना त्यांचा पैसा पुन्हा मिळेल का? हा मोठा प्रश्न आहे.
पूजा नाईकचे प्रकरण ताजे असतानाच पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या कुर्टी-फोंडा येथील सागर नाईक या कर्मचाऱ्याने एका महिलेला हायस्कूलमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत १५ लाखांना लुटले. या प्रकरणात त्याची मामी तथा माशेल भागातील एका हायस्कूलची मुख्याध्यापिका सुनीता पाऊसकर हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. तर, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपाश्री सावंत गावस बेपत्ता असून, पोलिसांनी तिच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. हे प्रकरण उजेडात येताच, शिक्षण खात्यात ‘एलडीसी’ची नोकरी देण्याचे आमिष दाखवून सिंधुनगर-कुर्टी येथील प्रकाश मुकुंद राणे या निवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरने चार जणांना ४० लाखांना ठकवल्याचे समोर आले. एकापाठोपाठ उजेडात आलेल्या या प्रकरणांनी राज्यात खळबळ माजली. परंतु, या प्रकरणांत नेमके दोषी कोण? पैसे घेणारे भामटे की पैसे देऊन सरकारी नोकरी खरेदी करू इच्छिणारे नागरिक? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
खरेतर, सरकारी नोकऱ्यांतील भ्रष्टाचार थांबवण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी नोकरीची पदे भरण्यासाठी कर्मचारी भरती आयोग सुरू केला आहे. आयोगाने आतापर्यंत काही पदांसाठी परीक्षाही घेतल्या आहेत. त्यामुळे यापुढे पैसे देऊन राज्यात सरकारी नोकरी मिळणार नाही हे लक्षात घेऊन नागरिकांनी अशा भामट्यांच्या नादी लागता कामा नये. दुसऱ्या बाजूला पूजा नाईक, सागर नाईक आणि प्रकाश नाईक यांच्या प्रकरणांत टोळ्या सक्रिय असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करून या प्रकरणांत जे कोणी सहभागी आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना कायमची अद्दल घडवणे गरजेचे आहे. अन्यथा, यापुढेही हे भामटे आपली ‘भामटेगिरी’ सुरूच ठेवतील.