किनारी भागातील बदलत्या हवामानाचा अभ्यास करणार : मंत्री सिक्वेरा

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट एजन्सीसह माजोर्ड्यात पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
किनारी भागातील बदलत्या हवामानाचा अभ्यास करणार : मंत्री सिक्वेरा

मडगाव : किनारी भागातील वाढत चाललेली धूप व वातावरणातील बदलामुळे होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला जात आहे. अहवालानंतर राज्य सरकार इतर राज्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन यावर चर्चा करणार आहे. यातून त्या राज्यांनाही फायदा होऊ शकतो व योग्य उपाययोजना करणे सोपे जाईल, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने शॅक्स पाण्याखाली गेल्याच्या वृत्तानंतर पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट एजन्सीच्या अधिकार्‍यांसह माजोर्डा किनारी पाहणी केली. किनार्‍याची वारंवार धूप होत असल्याची पाहणी करुन त्यानुसार वृक्ष लागवड किंवा इतर उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. राज्यातील मान्सूननंतरही सतत सुरू असलेल्या पावसामुळे व पौर्णिमा असल्याने भरतीच्यावेळी माजोर्डा, बाणावली, बेताळभाटी आदी किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. याची दखल घेत पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट एजन्सीच्या अधिकारी, गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यासह इतर जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांसह माजोर्डा किनारीपट्टीची पाहणी केली. यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले की, गोव्यातील किनारपट्टीवरील समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यावर अभ्यास केला जात आहे. मान्सून कालावधीतच समुद्रकिनारी भागात पाण्यात वाढ होत आहे की पाण्याच्या पातळीत वाढ दरवर्षी होत आहे, याचा अंदाज घेतला जाणार आहे. किनारी भागातील धूप रोखण्यासाठीही उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले.

मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले की, जुलै, ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात पाणी पातळीत वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यामुळे स्थानिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. वाढणार्‍या पाण्याच्या पातळीमुळे किनारी भागात कोणत्या प्रकारचे बदल होतात याचा अभ्यास केला जाणार आहे.

चेन्नईतील एजन्सी बनवतेय अहवाल

चेन्नई येथील एजन्सीकडून यावर अहवाल तयार केला जात आहे. एजन्सीकडून हवाई पाहणी करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष ज्याठिकाणी किनार्‍यांची धूप होते, जमीन पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होते त्याभागात पाहणी केली जात आहे. प्रत्येक राज्यानुसार किनारी भागातील प्रश्न वेगळे असतील पण यातून दुसर्‍या राज्यातील समस्या समजतील, असेही मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.


हेही वाचा