जिगरा : भावासाठी बहिणीचा संघर्ष

Story: प्रथमेश हळंदे। गोवन वार्ता |
17th October 2024, 10:21 pm
जिगरा : भावासाठी बहिणीचा संघर्ष

भावाच्या भल्यासाठी बहीण कुठल्या थराला जाऊ शकते, हे दाखवणारा ‘सरबजीत’ येऊन सात वर्षं झाली. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाला तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात पाकिस्तानात अडकलेल्या लहान भावाला सोडवण्यासाठी मोठ्या बहिणीने केलेल्या संघर्षाचे चित्रण होते. अशाच धाटणीचा ‘जिगरा’ हा वासन बाला दिग्दर्शित हिंदी सिनेमा सध्या थिएटरमध्ये गाजतोय.

या सिनेमाची कथा ही एका अनाथ भावंडांभोवती फिरते. सत्या ही अंकुरची मोठी बहीण. दोघेही अनाथ. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांचीही एका लांबच्या श्रीमंत नातेवाईकांकडे रवानगी होते. त्या घरात दोघांनाही सतत सावत्र वागणूक दिली जाते. पुढे एका बिझनेस टूरच्या निमित्ताने अंकुर परदेशी जातो आणि तिथे त्याला अमली पदार्थांशी संबंधित केसमध्ये अकारण अडकवले जाते. या देशात अशा गुन्ह्यांसाठी फक्त मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जात असल्याने आपल्या भावाला वाचवण्यासाठी सत्या जंग जंग पछाडते. यासाठी ती भाटीया नावाच्या एका गँगस्टर आणि मुतू नावाच्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याची मदत घेऊ पाहते. पण वास्तवात, ही मदत तिच्यासाठी शाप ठरते की वरदान, याचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा.

या सिनेमाची कथा, पटकथा वासन बाला आणि देबाशीष इरेंगबाम यांनी लिहली असून, त्यात पेरलेल्या अमिताभ बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’पटांच्या संदर्भांनी कथेला खास मिडास टच दिला आहे. अंकुरच्या भूमिकेत वेदांग रैना, मुतूच्या भूमिकेत राहुल रविंद्रन तर भाटीयाच्या भूमिकेत मनोज पाहवा या अभिनेत्यांनी रंगत आणली आहे. पण या सिनेमाचे मुख्य आकर्षण आहे ती सत्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री आलिया भट!

आलियाचा अतिशय वेगळा अवतार या सिनेमात बघायला मिळतो. लहान भावासाठी प्रचंड हळवी असलेली सत्या, आश्रितासारखे जगत असताना भावासाठी पदोपदी अपमान रिचवणारी सत्या आणि भावासाठी कुठल्याही संकटाचा सामना करणारी सत्या या वेगवेगळ्या छटा साकारत आलियाने आपल्यातील अभिनेत्रीला पुरेपूर न्याय दिला आहे. तिच्या वाट्याला आलेल्या अॅक्शन सीन्समध्ये ती सहज भाव खाऊन जाते. वासन बालाचा हटके दिग्दर्शकीय टच या सिनेमात हरवल्यासारखा वाटतो. सिनेमाचे पार्श्वसंगीतही तितकेसे प्रभावी नाही, हे बऱ्याच प्रसंगांमध्ये जाणवते. पण जर तुम्ही आलिया भट किंवा ‘जेलब्रेक’ कम अॅक्शनपटाचे चाहते असाल तर हा सिनेमा नक्कीच तुमच्यासाठी आहे.

हेही वाचा