मशिदीत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत!

कर्नाटक उच्च न्यायालय; मशीद सार्वजनिक जागा असल्याचे स्पष्ट

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th October, 06:45 pm
मशिदीत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत!

बंगळुरू : मशीद ही सार्वजनिक जागा आहे. मशिदीत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने बचाव पक्षाच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत आरोपांबाबत ठोस पुरावे नसल्याचे सांगितले.

बंगळुरूमधील एत्तूर गावातील मशिदीत जय श्री रामचा नारा दिल्याबद्दल कीर्तन कुमार आणि एनएम सचिन कुमार या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार हैदर अली सीएम म्हणाले होते की, गावात हिंदू आणि मुस्लिम वर्षानुवर्षे प्रेमाने राहतात. तरुणांनी गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आयपीसीच्या कलम ४४७, २९५ए, ५०५ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि दोन्ही तरुणांवर धमकावणे आणि गुन्हेगारी अतिक्रमण केल्याचा आरोप होता. यानंतर दोन्ही तरुणांनी या आरोपांना उच्च न्यायालयात आव्हान दिले.


याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना म्हणाले, जय श्री रामचा नारा लावणे हे धार्मिक भावना दुखावणारे कृत्य कसे मानले जाऊ शकते? धमक्या दिल्याचे आरोप झाले आहेत, त्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही.

कीर्तन कुमार आणि एनएम सचिन मशिदीबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसत होते, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. घोषणाबाजीच्या गुन्ह्यासाठी कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही, असा युक्तिवाद दोघांनी केला.

सुरुवातीला आरोपींना अनोळखी घोषित करण्यात आले, नंतर अटक करण्यात आली होती. कीर्तन कुमार आणि एनएम सचिन कुमार यांनी त्यांच्यावरील आरोपांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कारण सुरुवातीला गुन्हा दाखल करताना आरोपी अनोळखी दाखवण्यात आले होते.

हेही वाचा