२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार

राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th October, 04:29 pm
२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार

महाराष्ट्र: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. २८८ जागांसाठी  २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून  २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली आहे. 

आज मंगळवारपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करणार असून त्यासाठी १ लाख १८६ निवडणूक केंद्र असतील.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.

महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात असून येत्या काही दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.  


राज्यातील पक्षीय बलाबल-

महायुती १८७ जागा - भाजप - १०५, शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०, राष्ट्रवादी (अजित पवार) -४२

महाविकास आघाडी ७२ जागा - काँग्रेस - ४४, शिवसेना ठाकरे गट - १६, राष्ट्रवादी शरद पवार - १२

मतदानासाठी महत्त्वाच्या घोषणा

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सिनिअर सिटिझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शुटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत.पैसे, मद्य, ड्रग्स वाटपयावर कडक नजर ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा