देश : न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यांवरी​ल पट्टी हटविली

सर्वोच्च न्यायालयात ‘लेडी ऑफ जस्टिस’ म्हणजेच न्यायदेवतेचा नवीन पुतळा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th October, 12:05 am
देश : न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यांवरी​ल पट्टी हटविली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ‘लेडी ऑफ जस्टिस’ म्हणजेच न्यायदेवतेचा नवीन पुतळा बसवण्यात आला आहे. जुन्या पुतळ्याप्रमाणे या पुतळ्याच्या डोळ्यांवर पट्टी नसेल. त्याचबरोबर तिच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात हा पुतळा बसवण्यात आला आहे.

या नवीन पुतळ्याबाबतचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत. देशातील कायदा आंधळा नाही आणि ते शिक्षेचे प्रतीक नाही, असा संदेश देणे हा यामागचा उद्देश आहे. जुन्या पुतळ्याच्या डोळ्यांवरील पट्टी कायद्याच्या नजरेत सर्व समान असल्याचे दर्शवत होती, तर तलवार हे अधिकाराचे आणि अन्यायाला शिक्षा देण्याच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. आता पुतळ्याच्या उजव्या हातात तराजू कायम ठेवण्यात आला आहे, कारण तो समाजातील संतुलनाचे प्रतीक आहे.


ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून या पुतळ्याकडे पाहिले जात आहे. अलीकडेच भारत सरकारने ब्रिटिश राजवटीत लागू असलेल्या भारतीय दंड संहिता (आयपीसी) कायद्याच्या जागी भारतीय दंड संहिता (बीएनएस) कायदा लागू केला होता. लेडी ऑफ जस्टिसच्या पुतळ्यात बदल करणे हे देखील या अंतर्गत उचललेले पाऊल आहे.

डोळसपणा समान न्यायाचे प्रतिक...
कायदा आंधळा नसून तो सर्वांना समानतेने पाहतो, असे सरन्यायाधीशांचे मत आहे. न्यायालय पैसा, संपत्ती आणि समाजातील वर्चस्वाचे इतर मापदंड पाहत नाही. पुतळ्याच्या हातात तलवारीऐवजी संविधान असावे. जेणेकरून संविधानानुसार न्याय मिळतो, असा संदेश देशाला जातो. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, परंतु न्यायालये घटनात्मक कायद्यानुसार न्याय देतात, असा यामागचा विचार आहे.

‘लेडी ऑफ जस्टिस’चा इतिहास
रोमन पौराणिक कथांची न्यायदेवता ‘जस्टिसिया’ ही ‘लेडी ऑफ जस्टिस’ आहे. रोमन सम्राट ऑगस्टसने न्याय हा मुख्य गुण मानला. त्याच्यानंतर सम्राट टायबेरियसने रोममध्ये ‘जस्टिसिया’चे मंदिर बांधले. ‘जस्टिसिया’ न्यायाच्या गुणवत्तेचे प्रतीक बनले, ज्याच्याशी प्रत्येक सम्राट त्याच्या शासनाला जोडू इच्छित होता. सम्राट वेस्पासियनने तिच्या प्रतिमेसह नाणी प्रसिद्ध केली. त्याच्या नंतरच्या अनेक सम्राटांनी या देवीच्या प्रतिमेचा वापर करून स्वतःला न्यायाचे रक्षक घोषित केले. जगातील अनेक देशांमध्ये, न्यायदेवतेची ही मूर्ती न्यायालये, कायदेशीर कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दिसते.       

हेही वाचा