बार्देश : मालीम जेटीवरील बोट मालकांच्या समस्या लवकरच सोडवणार : मंत्री नीळकंठ हळर्णकर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
07th October, 05:15 pm
बार्देश : मालीम जेटीवरील बोट मालकांच्या समस्या लवकरच सोडवणार : मंत्री नीळकंठ हळर्णकर

पणजी : मालीम जेटीवरील बोट मालकांच्या विविध समस्यांवर पुढील पंधरा दिवसात उपाय योजना करण्याचे आश्वासन मत्स्योदयोग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिले. सोमवारी त्यांनी जेटीची पाहणी केली. यावेळी अखिल गोवा पर्सेसिन बोट मालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड, जीएसआयडीसी तसेच मत्स्योदयोग खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हळर्णकर यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. 

हळर्णकर यांनी सांगितले की, मालीम सिटी नूतनीकरणाचे काम जीएसआयडीसीतर्फे केले जात आहे. मात्र काही कारणास्तव कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून तो निघून गेला आहे. हे अपुरे काम करण्यासाठी खाते सल्लागार नेमू शकत नाही. त्यामुळे आम्ही जीएसआयडीसी सध्या आहे ते काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. हे झाल्यावर आम्ही येथे चांगल्या मूलभूत सुविधा देणार आहोत. जीएसआयडीसीने अशा कंत्रादारांना कलया यादीत टाकणे आवश्यक आहे. 

धोंड यांनी सांगितले की, जेटीच्या बांधकामाचा प्रश्न गेली सहा वर्षे सुरू आहे. आतापर्यंत येथे पाच ते सहा कंत्रादारांनी काम सोडून दिले आहे. जेटीचा ५० टक्के भागाचे काम झालेले नाही. येथे आम्हाला नेहमीची कामे करताना अडथळा निर्माण होत आहे. एखाद्या वेळी दहाहून अधिक बोटी आल्या तर मासळी उतरवणे देखील कठीण होते. काही ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने डासांची पैदास होत आहे. मंत्र्यांनी या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. 

जेटीचे काम प्राधान्याने करावे

यावेळी उपस्थित एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, जेटीचे काम २०१७ पासून सुरू आहे. नूतनीकरणात येथे शौचालय व अन्य इमारती बांधण्यात आल्या आहेत. मुळात या इमारती नंतर बांधल्या असत्या तरी चालले असते. या इमारतींपेक्षा मुख्य जेटीचे काम प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे.



हेही वाचा