मडगाव : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील जल, वायू प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार तक्रार करण्यात आलेली होती. आता कुंकळ्ळीतील नागरिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करत याची दखल घेण्याची मागणी केलेली आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना होत आहे. यासंदर्भात कुंकळ्ळीतील नागरिकांनी यापूर्वी आंदोलन केलेली आहेत. प्रदूषण कमी करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते तथा आमदार युरी आलेमाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांसह आयडीसीतील प्रदूषणाची पाहणी केलेली होती. यानंतर चार प्रदूषणकारी युनिटवर कारवाई करण्यात आलेली होती. मात्र, दंड भरुन अटीशर्तीवर त्या चारही युनिटसना पुन्हा सुरु करण्याची परवानगी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.
प्रदूषणावर ठोस व कायमस्वरुपी उपाययोजना न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यानंतर कुंकळ्ळीतील नागरिकांनी दिला आहे. आता नागरिक खबीर मोराईस यांनी राष्ट्रीय हरित लवादाला ई मेल्स करत कुंकळ्ळी आयडीसीतील प्रदूषणाची माहिती दिली तसेच हे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याचेही कळवले आहे. औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांमुळे वायू प्रदूषण होत आहे. जलप्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोतांची हानी होत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे म्हटले. याशिवाय मातीचा कस कमी होत असून याचा मोठा परिणाम हा येथील नागरी वसाहतीवर होण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे.
आयडीसीतील प्रदूषणाबाबत यापूर्वी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यपाल, स्थानिक आमदार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांना वेळोवेळी माहिती दिली पण ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरणाच्या हानीसह मानवी जीवनाला धोका होणार्या प्रदूषणाबाबत कारवाई करावी. प्रदूषण कमी होण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, प्रदूषण कमी होण्यासाठी आवश्यक नियमांचे व अटींचे पालन बंधनकारक करावे व स्थानिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कुंक़ळ्ळीतील नागरिकांकडून करण्यात आलेली आहे.