मडगाव : सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करत धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर डिचोली पोलिसात गुन्हा नोंद झालेला आहे. राज्यातील तियात्रिस्तांकडून आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन देत वेलिंगकर यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी अशी मागणी केली जाईल, असे तियात्रिस्त मिनीनो फर्नाडिस यांनी सांगितले.
मडगाव रवींद्र भवनच्या बाहेर जमून वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. मिनीनो यांनी सांगितले की, वेलिंगकर यांनी गोव्यासह जगभरातील ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यामुळे राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता तियात्रिस्त एकत्र आले असून सर्वांच्या सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्री, उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत सर्वधर्मीय लोक रस्त्यावर उतरले व निषेध नोंदवला. यापुढे अशाप्रकारची वक्तव्ये होवू नयेत यासाठी वेलिंगकर यांना अटक होण्याची गरज आहे, असेही सांगितले.
प्रिन्स जेकॉब यांनी सांगितले की, तियात्रिस्त आंदोलनात नव्हते असे नाही. काही तियात्रिस्तांनी निदर्शनात सहभाग दर्शवलेला होता. तियात्रिस्तांनी या विषयावर तियात्र काढून लोकांना जागृत केलेले आहे. वेलिंगकर यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आहे व त्यानुसार सरकारने कारवाई करावी. सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्या विषयावरुन लोक एकत्र आलेले असून यापुढेही अशीच एकजूट ठेवत लोक गोवा सांभाळतील, असेही जॅकोब यांनी सांगितले.वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंद केला नाही, त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ लोकांवर आली. आता त्यांना अटक करावी व राज्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी जमलेल्या इतर तियात्रिस्तांनी केली.