लाठीचार्जप्रकरणी थांबलेल्या आंदोलकांचीच चूक : प्रतिमा

मडगावातील रविवारचे आंदोलन काही तासांत गुंडाळले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th October, 11:59 pm
लाठीचार्जप्रकरणी थांबलेल्या आंदोलकांचीच चूक : प्रतिमा

मडगाव : शनिवारी रात्री आंदोलकांना आपण आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले व घटनास्थळावरुन जाण्यास सांगितले होते. पोलिसांकडून कारवाई होऊ शकते व एखाद्या आंदोलकाला गंभीर दुखापत होऊ शकते, त्यामुळे आंदोलकांना माघारी जाण्याची विनंती केली होती. त्यानंतरही काहीजण रस्त्यावरच थांबले, ही त्यांची चूक झाली. त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.

मडगाव येथील ओल्ड मार्केट परिसरात शनिवारी रात्री लाठीचार्जही घटना घडली. त्यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा नागरिकांनी निदर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. नागरिक येण्याआधीच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. याशिवाय नागरिकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या व रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी रस्त्यावर आल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस तुकडीही दाखल झाली. आंदोलकांची संख्या कमी व पोलिसांचा बंदोबस्त यामुळे वेळीच हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यासह जगभरातील लाखो भाविकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आताही काणकोण, सांगे, केपे येथून काही भाविक बसेसमधून येणार होते. पण, त्यांना येऊ नका म्हणून सांगितलेले आहे. राज्यभरात शांतता राखून गोवा सांभाळूया. वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू आहे. त्यांना जामीन मिळू नये यासाठी हरकत घेण्यात येणार आहे, असे कुतिन्हो म्हणाल्या.

राजकीय फायद्यावरुन आंदोलन फसल्याची चर्चा

मडगावात शुक्रवारी सुरू झालेल्या आंदोलनात आपचे आमदार क्रुझ सिल्वा व कार्यकर्तेही होते. त्यावेळी प्रतिमा कुतिन्हो व सावियो कुतिन्हो यांनी आंदोलनाचे उघडपणे नेतृत्व केले. सिल्वा यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाल्यानंतरही काहीकाळ वाद झाला. यानंतर शनिवारी सकाळी सासष्टीसह उत्तर गोव्यातूनही नागरिकांनी आंदोलनाला साथ दिली. पण हे आंदोलन राजकीय फायद्यासाठी वापरले जात असल्याची जाणीव होताच काही गटांनी यातून माघार घेतली व सासष्टीत विविध ठिकाणी आंदोलने केली. काहींच्या राजकीय पत सुधारण्याच्या नादात हे आंदोलन थंड पडल्याची चर्चा रंगली. 

हेही वाचा