वाळपईतील बैठकीत सूर: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन
वाळपईतील मराठी प्रेमींच्या बैठकीत उपस्थित असलेले अॅड. यशवंत गावस, माधव सटवाणी, डॉ. अनुजा जोशी, अॅड. शिवाजी देसाई व इतर.
वाळपई : मराठी भाषेमध्ये विश्वाला एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारने फार मोठे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे आणि त्यामुळे आता गोवा सरकारने देखील मराठीला राज भाषेचा दर्जा द्यायला हवा. जनतेने आता मराठी राजभाषेसाठी प्रत्येक तालुक्यातून सत्याग्रह करायला हवा, असा सूर रविवारी वाळपईत मराठी प्रेमींमध्ये उमटला. काणेकर सभागृहामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्या प्रकरणी आनंद साजरा करण्यासाठी तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अॅड. शिवाजी देसाई, कीर्तनकार विवेक जोशी, साहित्यिक चंद्रकांत गावस, म्हाळू गावस, डॉ. अनुजा जोशी, प्रकाश ढवण, पत्रकार उदय सावंत, विजय नाईक, माधव सटवानी, अॅड. यशवंत गावस, रोहिदास गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड. शिवाजी देसाई म्हणाले की, आमच्या डोळ्या देखत्त आज अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळत आहे, हे आमचे सौभाग्य आहे. परंतु त्याचबरोबर आता आपली आणि गोवा सरकारची जबाबदारी देखील खूप वाढली आहे. मराठीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात सरकारी कार्यालयात होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा आणि निवेदने मराठीतून सरकारी कार्यालयात द्यायला हवीत.
डॉ अनुजा जोशी म्हणाल्या की मराठी ही कोणत्याही एका धर्माची भाषा नाही. मराठीसाठी नियोजनबद्ध कामाची गरज आहे. सूत्रसंचालन विजय नाईक यांनी केले.
मराठी भाषा श्रीमंत : गावस
चंद्रकांत गावस म्हणाले की, मराठीला अभिजात भाषा देण्यासंबंधीचे विचार सुरुवातीला बडोद्याच्या साहित्य समकेनलान उमटले. सर्व भाषांमध्ये मराठी ही जुनी भाषा आहे. जितके श्रीमंत साहित्य मराठी भाषेत आहे. तितके अन्य दुसऱ्या भाषेत नाही. राजकारणामुळे अभिजात भाषेचे घोडे अनेक वर्षे अडकून पडले होते.