म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात वेलिंगकरांच्या समर्थनार्थ सभा
आज ६ ऑक्टोबर रोजी 'भारत माता की जय' या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हिंदू बांधवांनी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सभेचे आयोजन केले होते. हिंदू समाजाने एकसंघ व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तत्पुर्वी श्री देव बोडगेश्वराला गार्हाणे घालण्यात आले. यावेळी मोठ्यासंख्येने हिंदू संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी आपली या प्रकरणासंदर्भात मते मांडली. वेलिंगकरांच्या डीएनए चाचणीच्या मागणीमुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अर्थच येत नाही. हे शव त्यांचेच आहे की अन्य कुणाचे ही सत्य बाहेर यायलाच हवे. असे त्या म्हणाल्या. संदर्भ आणि योग्य कागदपत्रांच्या आधारेच वेलिंगकरांनी ही मागणी केली आहे. जगासमोर सत्य येणारच. त्यांना अटक करू देणार नाही असे सामंत यांनी म्हटले. दरम्यान हातकातरो खांबाचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे असे मारुती करमली यांनी म्हटले.
या सोहळ्यावर सरकार ४०० कोटी रुपये खर्च करते. हा आपल्या कराचा पैसा आहे. यामुळे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. वेलिंगकरांची मागणी घटनात्मक आहे. याविषयीचा बाऊ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. वेलिंगकरांवर कारवाई झाल्यास धर्म रक्षणासाठी सर्व हिंदू एकसंघ होतील असे सत्यविजय नाईक म्हणाले. दरम्यान यासभेत रूपेश सावंत, रमेश नाईक, गजानन मांद्रेकर, गणेश माटणेकर, सृजन नाईक, जयेश थळी व इतरांनी मनोगत व्यक्त करत वेलिंगकरांच्या मागणीला पाठींबा दिला. उल्हास पाळणी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.