सुखाचे आगर : श्री विजयादुर्गा संस्थान, केरी

देवीच्या समोर उभं राहिल्यावर आशा भोसले यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात गायलेलं ‘मागे उभा मंगेश' हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. असंच एखादं गाणं कुणीतरी कागदावर उतरवून स्वरबद्ध करावं असं राहून राहून वाटतं.

Story: विशेष |
4 hours ago
सुखाचे आगर :  श्री विजयादुर्गा संस्थान, केरी

परवाच लक्ष्मणराव सरदेसाई यांची ‘मांडवी! तू आटलीस?’ ही कादंबरी वाचून संपवली. त्यात एका विहंगम तळ्याचे दृश्य शब्दांनी चितारले होते. काठोकाठ बहरलेली अन् उंचच उंच आभाळाशी हितगूज करणारी कुळागरे, प्रेयसीने प्रियकराच्या काळजाशी बिलगावं तशा नारळाच्या झाडाला बिलगलेल्या पोफळी अन् ह्या तळ्याचं वर्णन तंतोतंत लागू होतं असं तळं अन् या तळ्याकाठी वसलेलं मंदिर म्हणजे फोंडा तालुक्यातील केरी गावात स्थापित श्री विजयादुर्गा संस्थान. 

माझा या अन् फोंड्यातील सर्वांगसुंदर गोमंतकीय देवळाराऊळांशी परिचय आईचं बोट धरूनच झाला. पण या देवळाशी माझं खास नातं आहे. इथली शांतता फार खोलवरची अन् मनाला तोषवणारी अशी आहे. माझ्या वांते गावापासून हे देऊळ जवळपास एकवीस किलोमीटर आहे तर पणजीपासून साधारण तीस किलोमीटर आहे. माझ्या गावातून निघून तांबड्याशार चौगुले खाणीवरून धुळीच्या ओबडधोबड रस्त्यावरून रस्त्यावर अन् अंगवळणी पडलेले खड्डे चुकवत वेळगे अन् वेळग्यातून सुर्ला गावाच्या डोंगरमाथ्यावर पोहोचलं की अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा झाल्याचा फील येतो. खाली तार व वर डोंगरमाथा म्हणून ज्या जागेला 'तारमाथा' म्हटलं जातं तिथून खाली उतरलं की सुर्ला-वळवई फेरीकडे पोहोचतो. तारमाथ्यावरून डांबरी रस्ता थेट फेरीच्या धक्क्यापर्यंत घेऊन जातो. खाली उतरत असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला पाचशे वर्षांपूर्वीची सुर्ला मशीद अरबांच्या सागरी व्यापाराच्या खाणाखुणा मिरवत उभी आहे. डुलतडुलत येणारी फेरी जवळ आल्यावर अजस्त्र भासते. पश्चिमेकडील वाऱ्याच्या तालावर हलत डुलत फेरीबोट पैलतडीला लागते. तिथून 'विजयादुर्गा संस्थान, केरी' असं गुगल मॅपला लोकेशन टाकलं की पुढच्या बारा मिनिटांत गुगलबुवा आपल्याला थेट मंदिरापर्यंत आणून सोडणार यात संशय नाही. वळवईहून सावईवेरे, सावईवेरे चावडीवरून पुढे सावईवेऱ्याच्या अनंत देवस्थानच्या महाद्वारावर ओझरती नजर फिरवत देवस्थानच्या तळीत डुंबायचा अतिव मोह अक्षरशः आवरून  सरळ चढती चढायची व वर जंक्शनला पोहोचल्यावर यू टर्न घ्यायचा. 

पुढे डोंगराडोंगरातला रस्ता अन् या रस्त्यावरून जाताना झाडीच्या अधूनमधून देवळाचा लाल-शुभ्र कळस डोकावतो. डाव्या बाजूला काजू व रानटी वनस्पतींनी गजबजलेला सरळसोट डोंगर तर उजव्या बाजूला तुरळक लोकवस्ती आहे. रस्त्याच्या खालच्या बाजूला भरपूर प्रमाणात पोफळीच्या बागायती आहेत. हे सगळं निरीक्षण करता करता आपण केरी गावात येऊन कधी पोहोचतो ते कळतच नाही. चावडीवरील मंदिरात विराजमान मारूतीरायाला अर्धी प्रदक्षिणा घालत उजवीकडे यू टर्न घेऊन पुढे गेलं की रस्त्याच्या उजव्या संस्थानाचं जांभ्या दगडात मढवलेलं भलंमोठं प्रवेशद्वार लागतं. त्या प्रवेशद्वारातून आत शिरलं की थोड्याच अंतरावर डावीकडे वरच्या बाजूला कल्याणमंडप तर थोडं पुढे जाऊन खालच्या बाजूला देवस्थानच्या समोरचं प्रांगण दृष्टिपथात येतं. 

फुल विक्रेत्या बायांचा 'बाय देवीक व्होंट व्हर गो', 'फाती व्हर गो', 'हार व्हर गो' हा धोशा इतर देवळांच्या मानाने फारच कमी आहे. देवळाच्या प्राकारात शिरताना दोन अक्राळविक्राळ प्राण्यांच्या मूर्ती आ वासून उभ्या आहेत. देवळाचा प्राकार आखीवरेखीव अशा बागेने सुशोभित केलेला आहे. देवळाला एक छोटेखानी गोपुरम आहे व त्याला जोडून अतिशय उत्कृष्ट लाकडीकाम केलेला जूना सभामंडप आहे. पायऱ्या चढून वर गेलं की आत एक मधला चौक व नंतर मुख्य चौक लागतो. मधल्या चौकाची उंची पाषाणी दगडांनी पुनर्बांधणी केलेली आहे. आतील चौकाचे छत, भिंती व खांब प्राचीन गोमंतकीय कावी कलेने सुशोभित केलेले दिसून येतात. ही नक्षीदार कलाकृती देवस्थान समितीने हल्लीच पुनरूज्जिवित केली आहे. मंदिराच्या गर्भगृहात आदिशक्ती विजयादुर्गा महिषासुरमर्दिनीच्या रूपात विराजमान आहे. देवीच्या समोर उभं राहिल्यावर आशा भोसले यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात गायलेलं ‘मागे उभा मंगेश' हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. असंच एखादं गाणं कुणीतरी कागदावर उतरवून स्वरबद्ध करावं असं राहून राहून वाटतं. देवीला प्रदक्षिणा काढत असताना प्रदक्षिणेत डाव्या बाजूला खिडकीवजा बैठकीत ठेवली भलीमोठी सहाण व चंदनाची कांडी तिथं एक मंदसा चंदनाचा सुगंध प्रसवत असल्याची अनुभूती तिथल्या तिथे येते. 

तुमच्याकडे जर का देवस्थानचा फोन नंबर असेल तर त्यांना तुम्ही दुपारच्या महाप्रसादाला येत असल्याचं कळवून इथल्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. महाप्रसादाचा बेत तरी अगदी साधा, चविष्ट व तृप्त करणारा असतो. वाफाळता भात, गरमागरम वरण व आमटी तर एकदम रूचिक असते. 

हे देवस्थान अन् याचा सभोवताल म्हणजे एक मोठ्ठं आनंदवन आहे. इथं नॉर्मल सिमकार्डला सहसा नेटवर्क नसतो‌ त्यामुळे तुम्हाला ऑफिसवर्कपासून लांब पळायचं असेल तर हे एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. 

महाप्रसादाचा लाभ घेतला की सावकाशीने चालत देवळासमोरून पायऱ्या उतरून खाली तळ्यावर जायचं. तुमची चाहूल लागली की बदकं पळून जातील‌ पण तुम्ही संयम पाळून तिथंच अर्धा तास रेंगाळत रहा. त्या बदकांना अन् छोट्या छोट्या पिल्लांना बघून लहान मुलांना मज्जा वाटते व लहान मुलं आनंदाने अक्षरशः चित्कारतात. शहर, गोंगाट, ट्रॅफीक, हायवे, बिल्डींग, काँक्रीट वगैरेंना विटलेल्या माणसाने या तळ्याकाठी शांतपणे तासनतास बसून सगळा परिसर न्याहाळावा. एखादा लक्ष्मणराव सरदेसाईंचा कथासंग्रह बाहेर काढून त्याचा अन् समोरच्या विहंगम दृश्याचा ताळमेळ घालावा. तिथंच कुठंतरी दूरवर लक्ष्मणराव आरामखुर्चीत बसून समोरचं दृश्य चेहऱ्यावर मंद स्मित हास्य धरून तल्लीन होऊन पाहत नसतील ना? किंवा जातीने विलियम वर्डस्वथ पुन्हा एकदा 'डॅफोडिल' लिहायला तिथंच तळ्याकाठी कुठंतरी रेलून बसला असेल. अशा ठिकाणी प्रपंच व अख्खं जग विसरून 

माणूस ध्यानमग्न होतो. याच अवस्थेला sublimity ऐसे नाव! 


विघ्नेश शिरगुरकर