बार्देश : म्हापशातील अपघातात दोघे आयआरबी पोलीस जखमी

कारची दुचाकीला धडक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd October, 12:41 am
बार्देश : म्हापशातील अपघातात दोघे आयआरबी पोलीस जखमी

विठ्ठलवाडी, म्हापसा येथे अपघातात सापडलेल्या गाड्या.

म्हापसा : विठ्ठलवाडी, अन्साभाट म्हापसा येथील कारने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात दोन आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले. सिध्देश ठाकूर (३५) व रमेश गोसावी (३१) अशी जखमींची नावे असून ते हरमल पेडणे येथील रहिवासी आहेत.

हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी आयआरबी पोलीस हे जीए ११ सी ६८२० क्रमांकाच्या मोटारसायकलवरून विठ्ठलवाडी येथूल अंतर्गत रस्त्यावरून दत्तवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूने जात होते. तर जीए ०३ एएफ ८०४२ क्रमांकाची कार घेऊन सिलेक्स डिसोझा (रा. मार्ना शिवोली) ही युवती विरोधी दिशेने येत होती. वाटेत मिशाळ यांच्या घरासमोरील चार रस्ता जंक्शनवर कारने दुचाकीने जोरदार धडक दिली.

या अपघातानंतर दोघेही पोलीस कॉन्स्टेबल रस्त्याच्या कडेला कोसळले. त्यातील एकाची शुद्ध हरपली. लगेच जवळील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व बेशुद्धावस्थेत पडलेल्या त्या कॉन्स्टेबलला सीपीआर दिला. नंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून दोघांनाही गोमेकॉत पाठवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचा पंचनामा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कांबळी व हवालदार सुदेश नाईक यांनी केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, दोघेही आयआरबी कॉन्स्टेबल पर्वरी वाहतूक विभागात सेवा बजावत होते. ड्यूटी करून ते घरी परत जात होते.

हेही वाचा